कुख्यात चोरटा, वन मॅन आर्मी गब्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील कुख्यात चोरटा नावेद उर्फ गब्या मो. कादीर याच्या शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी नागपूर येथून मुसक्या आवळल्या. दीड वर्षांआधी तो यवतमाळ येथील जेलमधून फरार झाला होता. फरार असला तरी त्याच्या घरफोडी मात्र सुरूच होत्या. विशेष म्हणजे पत्रकार आसिफ यांच्या घरी चोरी करताना त्याने आसिफ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर जबर हल्ला केला होता. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते. तेव्हापासून वणी पोलीस त्याचा शोध घेत होते.

वन मॅन आर्मी गब्या
नावेद उर्फ गब्या मो. कादीर (42) हा शहरातील मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. घरफोडी करण्यात तो पटाईत होता. गब्या हा वन मॅन आर्मी होता. तो एकटा चोरी करायचा. दिवसा बंद घर हेरून तो रात्री घरफोडी करायचा. सध्या अनेक चोरी प्रकरणाचा तपास मोबाईल लोकेशन ट्रेस करून केला जातो. ही बाब त्याला माहिती होती. त्यामुळे तो मोबाईल वापरत नव्हता. कुणाला फोन करायचा असल्यास तो इतरांचा फोन मागून फोन करायचा. घरफोडीच्या अनेक घटनांमध्ये तो सीसीटीव्हीत कैद झाला होता, असे म्हटले जाते. मात्र मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याला पकडणे पोलिसांना गेल्या काही काळापासून शक्य झाले नव्हते.

दीड वर्षाआधी गब्याला अटक, पण काही दिवसातच फरार
दीड वर्षांआधी वणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनेत अटक केली होती. 21 डिसेंबर 2021 रोजी गब्या हा भंगार, चोरीची गाडी व त्यात असलेले चोरीचे तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिरपूर रोडवर सापळा रचला. एका मालवाहू गाडी घेऊन गब्या आला होता. पोलिसांना पाहताच तो गाडी घेऊन पळाला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले होते. त्यानंतर त्याला यवतमाळ येथील जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना गब्याने शिताफिने पलायन केले.

पत्रकारावर जीवघेणा हल्ला
पत्रकार आसिफ शेख हे शहरातील गाडगेबाबा चौकातील रहिवासी आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी घरी ते एकटेच होते. त्यामुळे तळमजल्याला कुलूप लावून ते वरच्या माळ्यावर झोपायला गेले होते. घराला कुलूप बघून मध्यरात्री गब्या त्यांच्या घरी शिरला होता. आसिफ यांना मॉर्निंग वॉकची सवय असल्याने ते 5 वाजताच्या सुमारास पाय-यावरून खाली येत होते. नेमके त्याचवेळी गब्या हा वरच्या माळ्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने जात होता. आसिफ आणि गब्या पाय-यांवर समोरासमोर येताच गब्याने आसिफ यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांनी गब्याला ओळखले असल्याने पोलीस तेव्हापासून गब्याचा शोध घेत होते.

अशी झाली अटक…
गब्याचे कुणी मित्र नाही किंवा चोरीसाठी साथीदार नाही. तो एकटाच चोरी करायचा. शिवाय तो मोबाईल वापरत नसल्याने त्याल ट्रेस करणे अवघड जात होते. पत्रकारावरील हल्ल्यानंतर पोलिसांवर गब्याला अटक करण्याचा दबाव आला होता. तेव्हापासून वणी पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष होते. शनिवारी गब्याच्या भावाचे नागपूर येथे लग्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या लग्नाला तो येईल याची पोलिसांना खात्री होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. वेशांतर करून पोलीस या लग्नात गेले होते. संध्याकाळी 6.30 ते 7 वाजताच्या सुमारास गब्या लग्नस्थळी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अनेक घरफोडींच्या प्रकरणाचा होणार उलगडा
गेल्या दोन वर्षांपासून शहरात घरफोडीने कहर केला आहे. प्रत्येक बंद असलेल्या घरात चोरी झाली आहे. घरानंतर चोरट्यांनी रात्री बंद असणा-या दुकानाकडे आपला मोर्चा वळवला होता. यवतमाळ रोड, वरोरा रोड वरील कित्येक दुकाने चोरट्याने फोडली. यात कोट्यवधींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. मात्र अद्याप एकाही चोरीच्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला नव्हता. गब्याच्या अटकेमुळे चोरीच्या अनेक प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे बोलले जात आहे.

सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्त्वात माधव शिंदे, सुहास मंदावार, विशाल गेडाम, सचिन मडकाम यांनी पार पाडली.

Comments are closed.