गडचिरोलीच्या अतिरेकी विकासाने आमटेंची स्नुषा चिंतित!

वाचा वणीतल्या एका ज्येष्ठ मुक्त पत्रकाराचा वेगळा लेख

श्रीवल्लभ के. सरमोकदम, वणी: गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरु झालेले औद्योगिकीकरणाचे वारे भविष्यात कोणते रूप घेणार? या एकमेव विचाराने सध्या आमटे कुटुंब चिंतेत आहे. मुंबईचे माहेर असलेल्या डॉ.प्रकाश आमटे यांच्या स्नुषा समीक्षा अनिकेत आमटे दंडकारण्यातील या अतिरेकी विकासाने अधिकच भयकंपीत झाल्या आहेत. स्थानिक जैताई चैत्र नवरात्रौत्सवात प्राचार्य राम शेवाळकर स्मृति “शिक्षणव्रती”पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना त्यांच्या मनातील भयकल्लोळ प्रकर्षाने जाणवला.

Podar School 2025

ज्येष्ठ सेवाव्रती बाबा आमटे यांच्या तिसर्‍या पिढीतील अनिकेत सहधर्मचारिणी समीक्षासह हेमलकसा येथे कौटुंबीक वारसा वृद्धींगत करीत आहे. त्या परिसरात परिघाबाहेर जाऊन माडिया समाजाला प्रचलित शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्याच्या कार्यासाठी वणीतील जैताई देवस्थानच्या वतीने पू. मामा क्षीरसागर स्मृतिदिनी या दाम्पत्यास हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुंबई येथील गोडसे कुटुंबाचे माहेर लाभलेल्या समीक्षा, माता-पित्याच्या विरोधात जाऊन अनिकेत आमटेंशी विवाहबद्ध झाल्या. महाराष्ट्राच्या पश्चिम टोकावरून थेट पूर्वेच्या दंडकारण्यात त्यांनी वैवाहिक आयुष्याची सोळा वर्षे पूर्ण केलीत. विवाहापूर्वी समीक्षाने सुसाट धावणार्‍या मुंबईसारख्या महानगराला जवळून अनुभवले आहे. सहलीच्या निमित्ताने हेमलकसाला आलेल्या समीक्षाला हा परिसर,तेथील वातावरण व आमटे कुटुंबाच्या कार्याने एवढे आपलेसे करुन घेतले की, त्यांनी मुंबईला परतताना आपले वैवाहिक आयुष्य दंडकारण्यात घालवण्याचा निर्णय घेतला. या निर्धारापुढे त्यांच्या माता- पित्यांनाही झुकावे लागले.

चमचमत्या महानगरीच्या संस्कारात लहानाच्या मोठ्या झालेल्या समीक्षा गोडसे- आमटे गेल्या सोळा वर्षांत गडचिरोलीतील जंगले, तेथील जनमानस, आमटे कुटुंब या सर्वांशी पूर्णतः एकरूप झाल्या आहेत. सुसाट धावणारी, जीवनाचा अर्थ संपविणारी शहरे आणि जगण्याचा अर्थ अधोरेखित करणारी अस्सल जीवनस्थळे यातील फरक आणि अंतर समीक्षाला पुरता कळून चुकला आहे. शहरांत पावलोपावली असलेली जीवघेणी स्पर्धा आणि निखळ आयुष्याची “प्रकाशवाट” या दोन्ही मार्गांच्या त्या वाटसरू ठरल्या आहेत.

म्हणूनच की काय त्यांना या दोहोंतला फरकही उमगला आहे. त्यामुळेच गडचिरोलीच्या प्रांगणात येऊ घातलेला औद्योगिक विकास समीक्षा आमटेंना कमालीचा अस्वस्थ करुन सोडत आहे. वणीतील सत्कार समारंभात मनातील कल्लोळ व्यक्त करताना, ही अस्वस्थता प्रकर्षाने समोर आली.

आजपर्यंत आपली स्वतंत्र ओळख मिरविणार्‍या या परिसरात स्टिल हब, खाणीं या रूपांत शहरी हस्तक्षेपाने वेग घेतला आहे. ज्या वेगाने हे सर्व सुरू आहे, त्यामुळे समीक्षा आमटेंच्या मनातील घालमेल अधिकच वाढली आहे. पाहता – पाहता येथील वृक्षवेली, प्राणी, माणसे सर्व काही कर्णकर्कष आवाजाचा बळी ठरतील.

दंडकारण्यातील प्रदूषणविरहीत शांतता कोलाहलात परिवर्तीत होईल. अन् होत्याचे नव्हते होईल. अर्थात तो दिवसही फार नजिकचाच असेल… या एकमेव कल्पनेने… पुढे काय आणि कसे होणार? या विचाराने समीक्षाला पछाडले आहे. दंडकारण्यातील अनेकांना काहिसा असाच प्रश्न पडला आहे. पण उद्ध्वस्त आयुष्याचे वाटसरू ठरलेल्या आमटे कुटुंबीयांच्या स्नुषेच्या भावनेच “समीक्षा” होईल काय?हाच खरा प्रश्न आहे. (लेखक – श्रीवल्लभ सरमोकदम 7498169606 )

Comments are closed.