खरे संभाजी कळले तर जगावर साम्राज्य निर्माण करता येईल – गंगाधर बनबरे

बळीराजा व्याख्यानमालेचे वाजले सूप

0

वणी: छत्रपती संभाजी राजे यांचे खरे चरित्र जाणीवपूर्वक आपल्यापासून लपविण्यात आले. देव-धर्माची भूल देऊन वास्तवापासून भरकटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहिले. मन, मेंदू आणि मनगटाचे बळ असणाऱ्या  समाजाची विचार करण्याची क्षमताच रोखून ठेवण्याचे आतापर्यंत षड्यंत्र चालत आले आहे. खरे संभाजी कळले तर संपूर्ण जगावर साम्राज्य निर्माण करता येईल, अशी प्रचंड ऊर्जा छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रात आहे, असे प्रतिपादन पुणे येथील विचारवंत गंगाधर बनबरे यांनी केले.

शिव महोत्सव समिती द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ‘छत्रपती संभाजी महाराज: धर्मवीर की स्वातंत्र्यवीर’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवधर्म समन्वयक इंजि. देवानंद कापसे होते. यावेळी विचारपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, सेवानिवृत्त शिक्षक नीळकंठराव जुमनाके, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विजय खापणे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेशा अंकुश बलकी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रीती राहुल खाडे, शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. नीलेश चैधरी, मराठा सेवा संघ वणीचे अध्यक्ष मंगेश खामनकर उपस्थित होते. पुढे बोलताना बनबरे म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे हे स्वातंत्र्यवीर होेते. स्वातंत्र्य म्हणजे शोषकांची सत्ता नेस्तनाबूत करून लोकांचं राज्य निर्माण करणे होय. विषमता नष्ट करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्त्व निर्माण करणे होय. याचा प्रत्यय छत्रपती संभाजी राजांच्या जीवनचरित्रातील प्रत्येक घटना, प्रसंगातून प्रत्ययास येतो. सामान्य माणसाला त्याच्या हक्कांची जाणीवच होऊ नये म्हणून त्यांना देव व धर्म नावाची भूल नेहमीच देण्यात आली व ती आजही दिली जात आहे.

आपण आपले महापुरुष स्वीकारले पाहिजेत. त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष जगण्यात व व्यवहारात आणले पाहिजे. आपण कधीच आपल्या महामानवांची वैचारिकता पूर्णपणे स्वीकारली नाही म्हणूनच पारतंत्र्याची व पराधिनतेची विषारी फळे आपल्याला चाखावी लागली. मानसिक व वैचारिक गुलामगिरी आपल्यावर लादण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज व अनेक महामानवांवर विकृत लिखाण करण्यात आले. मूळ व वास्तववादी इतिहासावर जी जळमटं पसरली आहेत, ती झटकली पाहिजे. गुलामगिरी दूर करण्यासाठी इतिहासाचे आकलन केले पाहिजे. आजची नवीन संसाधनं, ऊर्जास्थळे, शस्त्रे, शास्त्रे समजून घेतली पाहिजे. अज्ञान दूर झाले की गुलामगिरी दूर होण्याचे प्रयत्न सुरू होतात. विदर्भाला लोकसंत गाडगेबाबांचा खराटा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खंजेरी आणि भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुखांचा खडूने क्रांतीची पे्ररणा दिली आहे. ज्या घरात या महामानवांच्या तस्बीरीजरी असतील त्या घरातील लेकरं लाचार निघणार नाहीत.

इतिहास हे एक माध्यम आहे. यातून वर्तमानाच्या प्रेरणा घेतल्या पाहिजेत. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संभाजी राजांना धर्मवीर ठरवून अडचणीत आणले आहे. अशा महामानवांना धर्माच्या चैकटीत कधीच बंदीस्त करू नये. धर्म रक्षण वगैरे थोतांड आहे. या प्रकारात गुंतल्याने आपली वैयक्तिक प्रगती खुंटते. धर्माची भूल हा प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. जो आपल्याला सांगतो की देव आणि धर्मासाठी मरणारा स्वर्गात जातो, तो कधीच यासाठी मरत नाही. स्वर्ग किंवा अशा फसव्या प्रलोभनांना बळी पडणे बंद करा. देव-धर्मासाठी मरणं थांबवा. जे सांगत आहेत, त्यांना त्यासाठी खुशाल मरू द्या. ही एक नवी लढाई आहे. खरा इतिहास समजून घ्या. आपल्यावर मानसिक व वैचारिक गुलामगिरी लादण्यासाठी आपल्या महामानवांवर विकृत लिखाण झालं आहे. इतिहास घडवणं वेगळं, समजून घेणं वेगळं आणि लिहिणं वेगळं असतं. इतिहास लिहिणाऱ्याची भूमिका व प्रामाणिकता तपासून घेतली पाहिजे. आपल्या इतिहासाचं प्रे रणादायी पुनर्लेखन करावं लागेल. युवकांचे प्रेरणास्थान संभाजीराजे समजून घेतले तर, तरुणांची एक नव्या युगाची पिढी तयार होईल. अवघे 32 वर्षे आयुष्य लाभलेल्या संभाजी राजांचा जन्मापासूनचाच प्रवास खडतर राहिला आहे. आजन्म त्यांनी परकीय व स्वकीय शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण केले.

बुधभूषणम्, नायिकाभेद, नखशिख, सातसतक अशा ग्रथांची रचना केली. छत्रपती संभाजी राजांचा मूळ व तत्कालीन इतिहासग्रंथांत कुठेच धर्मवीर असा उल्लेख नाही. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे हे सर्वच धर्मांचा आदर करीत होते. विनायक दामोदर सावरकर यांनी 1928 साली ‘हिंदू पदपातशाही’ हा ग्रंथ लिहिला. त्यात संभाजी राजेंचे वर्णन मदिरा व मदिराक्षीत गुंतलेला नादान राजपूत्र असे केले. संभाजी राजेंनी धर्मासाठी मरण पत्करलं केवळ याच गोष्टीसाठी त्यांना माफ केलं पाहिजे असंही त्यात नमूद आहे. आपल्यापेक्षा वयाने 15-16 वर्ष मोठ्या असलेल्या औरंगजेबाच्या मुलीचा हात मागणे या भाकडकथा रचण्यात आल्यात. इतिहासकार शेजवलकर म्हणतात की, या सर्व प्रतिमा जाणीवपूर्वक उभ्या करण्यात आल्यात. त्यांना धर्मासाठी नव्हे, तर धर्मामुळे मरण आलं. त्यांना मनुस्मृती व तत्सम धर्मग्रंथानुसार शिक्षा देण्यात आली.

केवळ भारतीयच नव्हे तर 60हून अधिक विदेशी व मोगली इतिहासकारांनी त्यांच्या ज्ञान, विवेक व शौर्यावर भरभरून सत्य लिहून ठेवलं आहे. समकालीन कवी परमानंद यांनी अनुपुराण हा ग्रंथ लिहिला. त्यात ते म्हणतात की, संभाजी महाराज हे महापंडित व ज्ञानी होते. त्यांची आकलनक्षमता प्रचंड असून ते ज्ञानाचे सागर होते. अॅबे कारे सारख्या अनेक विदेशी इतिहासकारांनी त्यांचा गौरव केला. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या पाणीप्रश्नासाठी कालव्यांचा प्रयोग केला. तो धागा पकडून संभाजी राजेंनी तो अधिक विकसित केला. शेतसारा वसूल करताना बळजबरी व अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केल्यात. शेतकऱ्याचे कर्ज माफ केले. त्यांना बियाणे, पशू, पैसा अशा अनेक सुविधा पुरविल्यात. प्रजेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा राजा अशी शेतकरी व सर्व प्रजेमध्ये त्यांची प्रतिमा होती. महात्मा बळीराजासारखे त्यांचे उदात्त धोरण शेतकऱ्यासाठी होते. शेतकऱ्याचे काम त्वरीत व्हावे म्हणून नांगर असलेली विशेष राजमुद्रा होती. त्यावर लगेच कार्यवाही व्हावी असे आदेश त्यात सूचित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना अगदी लहानपासूनच सर्व मोहिमेत, राजकीय बैठकीत, चर्चेत सोबत ठेवले. संभाजी राजेंची आपल्या कारकीर्दीत जेवढ्या लढाया केल्यात, युद्ध केलेत ते त्या सर्वात विजयीच राहिले. स्वराज्याची इंचभरही जागा त्यांनी जाऊ दिली नाही. उलट ती वाढतच राहिली. संभाजी राजांना इंग्रजी, संस्कृत पासून तर अनेक भाषांचा उत्तम अभ्यास होता. ते बहुभाषक होते. पहिला शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टाने त्यांना गं्रथ संभाजी राजांना अर्पण केला. साहित्यविश्वाला अनमोल देणगी संभाजी राजांनी दिली. शेतकऱ्याची, स्त्रियांची व सामान्यजनांची बाजू घेणारे राजे छत्रपती संभाजी होते. ब्राह्मणी वर्चस्वाला धोका होऊ नये म्हणून त्यांच्यावर विकृत लिखाण झाले. त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडविण्यात आले. राजांना अनेक पत्नी करण्याचा अधिकार असतानादेखील त्यांना फक्त एकच पत्नी होती. एवढेच नव्हे तर तिला स्वतःची राजमुद्रा दिली. संपूर्ण अर्थखात्याचा व्यवहार त्यांनी दिला होता. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनादेखील छत्रपती संभाजी राजांच्या जीवनचरित्राची प्रेरणा होती. एका महासूर्याला वर्चस्व सहन न झाल्यामुळे झाकण्याचे प्रयत्न झालेत. गंगाधर बनबरे यांनी अनेक इतिहासकारांचे दाखले देत, अनेक घटना व उदाहरणांसह छत्रपती संभाजी राजे व्याख्यानातून मांडले.

इतिहास या विषयासह सध्याच्या आर्थिक, सामाजिक तसेच विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांना या व्याख्यानमालेत निमंत्रित करण्यात येते. पहिल्या वर्षी गंगाधर बनबरे यांचे पहिल्या सत्रात ‘लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर तर दुसऱ्या सत्रात ‘बहुजन उ़द्धारक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’या विषयावर व्याख्यान झाले. दुसऱ्या वर्षी विजय जावंधिया यांचे ‘शेतीसमोरील आव्हाने आणि शासकीय धोरणे’ या विषयावर व स्मिता पानसरे यांचे ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि परिवर्तनवादी चळवळी’ या विषयावर व्याख्यान झाले होते. 2017चे पहिले सत्र रामचंद्र जागोजी सपाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. रमेश सपाट यांच्या सौजन्याने झाले. संजय गोडे यांनी प्रास्ताविकात रामचंद्र सपाट यांची कारकीर्द विशद करीत आयोजनाचा गाभा स्पष्ट केला. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे छत्रपती महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना इंजि. देवानंद कापसे यांनी इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे असा आग्रह धरला. इतिहासावर योग्य चिंतन व संशोधन झाले पाहिजे असे त्यांनी म्हटले. या प्रसंगी ही व्याख्यानमाला तीन दिवसीय असावी अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन विकास चिडे यांनी तर आभार प्रदर्शन रवी आंबटकर यांनी केले. समितीचे डॉ. करमसिंग राजपूत, निमंत्रक कृष्णदेव विधाते, विलास शेरकी, संजय गोडे, सुरेंद्र घागे, डॉ. अर्शद शहा, अशोक चैधरी, प्रा. अनिल टोंगे, मोहन हरडे, रविंद्र आंबटकर, विलास मेश्राम, जानू अजाणी, जयंत कुचनकर, विजय दोडके, संजय कालर, अजय धोबे व सदस्यांनी संपूर्ण आयोजनाची व्यवस्था सांभाळली. सभागृह व बाहेरची श्रोत्यांची खच्च उपस्थिती हे या व्याख्यानमालेचे विशेष राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.