गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी

टाळ्या, शिट्ट्या, उत्साह, जल्लोष.... महिला प्रेक्षकही लावणी नृ्त्यावर बेधुंद

निकेश जिलठे, वणी: बेधुंद तरुणाई, टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष, उत्साह आणि सबसे कातील गौतमी पाटील या घोषणांनी वणीत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाला वणीकर आणि परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली. गौतमी पाटील आणि संचाने सादर केलेल्या एक से बढकर एक लावणीवर प्रेक्षक चांगलेच थिरकले. गौतमी पाटील यांच्या कातिल अदांवर केवळ पुरुषच नाही तर महिलांही चांगल्याच फिदा झाल्या. कार्यक्रमात महिलांसाठी विशेष व्यवस्था असल्याने महिला प्रेक्षकांनीही बेधुंद होत कार्यक्रमाचा आनंद घेतला. शुक्रवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी वणीतील शासकीय मैदानावर टी-10 चॅम्पियन ट्रॉफिच्या उद्घाटना निमित्त गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी 10 चे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांनी केले. यावर्षीचा T-10 चा दुसरा सिजन हा दुप्पट उत्साह, दुप्पट ताकद आणि बक्षिस देखील दुप्पट घेऊन आला आहे. असे मनोगत व्यक्त करत त्यांनी सर्व संघाना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व सहभागी संघ, संघमालक व खेळाडुंची स्टेजवर बोलवून ओळख करून दिली. कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि विजय चोरडिया यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सहकलाकार माही पुणेकर यांच्या शौकिंनाचा मेळा या लावणीने झाली. त्यानंतर 440 करंट, उचकी, खुळखुळ, नार नवेली हे लावणी नृत्य झाले. त्यानंतर स्टेजवर गौतमी पाटीलची एन्ट्री झाली. यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष करीत गौतमी पाटीलचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या चंद्रा या लावणीने संपूर्ण मैदानात एकच जल्लोष दिसून आला. प्रेक्षकात येऊन नृत्याच्या अदा केल्या. त्यानंतर एका पेक्षा एक लावणी गौतमी पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी सादर केल्या.

 

वणीकर महिलेला दिले गौतमी पाटीलने अलिंगण
महिलांसाठी या कार्यक्रमात वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. नृत्य करताना गौतमी पाटील समोर उपस्थित महिलांमध्ये जाऊन मिसळल्या. त्यांनी वणीच्या महिलांची भेट घेतली. यावेळी उत्साही महिलांनी गौतमी पाटील सोबत सेल्फी घेतली. दरम्यान गौतमी पाटील यांनी एका महिला प्रेक्षकाला अलिंगण देखील दिले. विशेष म्हणजे लावणी नृत्यावर प्रेक्षकात बसलेल्या महिला देखील चांगल्याच थिरकल्या.

कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटला की, तरुणाई तुडुंब गर्दी करतं. त्यामुळे काही ठिकाणी हुल्लडबाजी देखील झाल्याचे समोर आले. मात्र अशी कोणतीही परिस्थिती वणीत उद्भवू नये म्हणून आयोजकांतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचा ताफा तसेच बाउंसर सुरक्षेसाठी तैनात होते.

अवधूत आणि प्रणय या तरुणांनी शेरोशायरी, मिमिक्री, किस्से सांगत कार्यक्रमाचे बहारदार संचलन करून कार्यक्रमात आणखी रंगत आणली. दिनांक 2 जानेवारीपासून 2 जानेवारी 2024 पासून लीगला सुरूवात होणार आहे. T-10 ही चॅम्पियन लीग स्पर्धा ही वणीच्याच नाही तर जिल्ह्यातील क्रीडा विश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन चॅम्पियन लीग कार्यकारिणीचे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.