सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘हे’ ठरलेत विजेते

जैताई महोत्सवात मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव... अपघाताने अपंगत्व आलेल्याला मदतीचा हात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा सोमवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी निकाल लागला. या परीक्षेत ज्यु. गटामध्ये स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची रिपूपर्णा परिडा व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूलची निहारिका शहाकार यांनी बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. तर सि. गटामध्ये एसपीएम विद्यालयाची आरती दिलिप गोबाडे हिने पहिला क्रमांक पटकावला. सोमवारी जैताई मंदिरातील सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. सदर स्पर्धा ही स्माईल फाउंडेशनतर्फे घेण्यात आली होती. याच कार्यक्रमात अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्तीला विजय चोरडिया यांच्या तर्फे व्हील चेअर देण्यात आली. 

मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती. ज्यु. गट वर्ग 5 ते 7 गट व सि. गट वर्ग 8 ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत 1600 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्यु. गटामध्ये रितूपूर्णा परिडा, निहारिका शहाकार यांनी समान गुण मिळावत प्रथम क्रमांक पटकावला. तर स्वर्णलीली शाळेची स्वरा शेडामे द्वितीय आला. तर डीएव्ही स्कूलचा क्रिष्णा काकडे तृतीय तर मायक्रून स्टुडंट अकाडमीची अश्मिरा खान हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 3100, 2100, 1100, 501 रुपये रोख व सन्मानचिन्ह असे बक्षिस होते.

सिनियर गटात एसपीएम शाळेची आरती दिलीप गोबाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. याच शाळेतील तेजस्विनी राजू गव्हाणे हिने द्वितीय पुरस्कार पटकावला. वणी पब्लिक स्कूलची आर्या मत्ते ही तृतिय आली तर समान गुण मिळवत स्वर्णलीला शाळेची निधी शर्मा व नुसाबाई चोपणे विद्यालयाची सूरभी चोपणे या दोघींनी चतुर्थ क्रमांक पटकावला. विवेकानंद शाळेतील पियुष श्रीरसागर व जनता विद्यालयातील हर्षा विनोद ठमके यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. या गटातील विजेत्यांना 5001, 3001, 2001, 1001 व 500 रुपये रोख बक्षिस देण्यात आले.

जैताई मंदिराच्या प्रांगणात रंगला बक्षिस वितरण सोहळा
शहरातील जैताई मंदिरात सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात सर्व विजेत्या विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. विजय चोरडिया, माधवराव सरपटवार ऍड. कुणाल चोरडिया, मुन्नामहाराज तुगनायत, मुन्ना पोद्दार, राजाभाऊ बिलोरिया, नामदेवराव पारखी, विनय कोंडावार, मूलचंद जोशी, मयूर गोयनका इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकरांनी हजेरी लावली होती. 

अपघाताने अपंगत्व आलेल्याला आधार
तालुक्यातील लाठी येथील गणपत खोके यांचा काही वर्षाआधी अपघात झाला होता. त्यात त्यांना अपंगत्व आले. ते गेल्या 2-3 वर्षांपासून व्हील चेअरसाठी प्रयत्न करीत होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना व्हील चेअर मिळाली नाही. दरम्यान ही बाब राहुल खारकर यांच्या मार्फत दिलीप कोरपेनवार, सागर जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी ही बाब विजय चोरडिया यांच्यापर्यंत पोहोचवली. विजय चोरडिया यांनी तात्काळ व्हील चेअर देण्याचे मान्य केले. बक्षिस वितरण कार्यक्रमातच गणपत खोके यांना व्हील चेअर देण्यात आली. अनेक प्रयत्न करूनही सातत्याने मदत मिळत नसल्याने गणपत खोके हतबल झाले होते. अखेर विजय चोरडिया यांच्या प्रयत्नातून त्यांना व्हील चेअर मिळाल्याने ते भावूक झाले. यांनी विजय चोरडिया यांचे आभार मानले.

Comments are closed.