‘घानमाकड’ ग्रंथ हा अस्सल ग्रामीण अनुभवांचा आरसा आहे- संध्या पवार

पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांच्या पुस्तकाचे जैताई चैत्र नवरात्रौत्सवात पुनर्प्रकाशन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपण पुढे गेलो तर मागे वळून पाहायचं नाही अशी वृत्ती जेव्हा असते ना तेव्हा माणूस एकटा असतो. आपण पुढे जात राहतो; पण मागे वळून पाहण्याची सवय लावून घ्यावी. तिथे आपली जुनी नाती आपणही जोडत असतो. पण आजचा काळ खरंच वेगळा आहे. आपण पुढेच पुढे धावतो. या काळामध्ये मागे वळून पाहणाऱ्या अविनाश महालक्ष्मे यांचं मला विशेष कौतुक वाटतं. ‘घानमाकड’ हा ग्रंथ नुसत्या कल्पनेनं लिहिलेला नाही. तर अस्सल ग्रमीण अनुभवांचा आरसा आहे. असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या संध्या पवार यांनी केले.

वणीत सध्या श्री जैताई चैत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. त्यातील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांच्या ‘घानमाकड’ या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन संध्या पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रकाशनपिठावर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दिलीप अलोणे, माधव सरपटवार, लेखक अविनाश महालक्ष्मे, मुख्याध्यापक गजानन कासावार उपस्थित होते. पुढं बोलताना संध्या पवार यांनी पुस्तकावर विस्तृत भाष्य केलं. त्या म्हणाल्यात की, यातील प्रत्येक अनुभव अगदी जिवंत आहे. अस्सल ग्रामीण भागाचे वर्णन पानोपानी आढळतं. या पानापानामध्ये लेखकाच्या वृत्तीचीपण ओळख होत जाते. लेखक त्यातून कसा घडत होता, याचाही प्रत्यय येतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

‘घानमाकड’ या पुस्तकावर भाष्य करताना संध्या पवार

 

आजची खेडी फार प्रॅक्टिकल झाली आहेत. म्हणजे पुस्तकात दिसणारा ओलावा आजच्या खेड्यांत जाणवत नाही. हे जर पुस्तक वाचलं नसेल पुढच्या पिढीने किंवा वाचणार नाही पुढची पिढी तर त्यांनाही वाटेल की खरंच असं होणं शक्य नाही. ग्रामीण भागामध्ये एवढी माणुसकी असणं ग्रामीणच नाही तर त्या काळाच्या मातीमधील माणुसकी एवढ्या प्रचंड प्रमाणात टिकून असणं हे शक्य नाही. असं वाटल्याशिवाय राहणार नाही. आज संवाद तुटलेला आहे. या संवाद तुटण्याच्या काळामध्ये अशी पुस्तकं आमच्या नवीन पिढीने जर वाचली ना तर त्या पिढीने काय भोगलं हे लक्षात येईल. पुस्तकाला अजून उठावदार बनवतात प्रस्तावना. एका वृत्तपत्राचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या प्रस्तावनेने या पुस्तकाला एक श्रीमंती बहाल केली आहे.

प्रास्ताविक भूमिका मांडताना माधव सरपटवार

 

प्रास्ताविक भूमिका मांडताना माधव सरपटवार म्हणालेत की, जैताई मंदिर केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत नाही. तर शैक्षणिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जाणीवपूर्वक करत असते. अविनाश यांनी या पुस्तकांमध्ये शिरपूरमधल्या त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगितल्यात. या पुस्तकाला संपादक श्रीपाद अपराजित यांची अतिशय सुंदर प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनाचं वैशिष्ट्य असं की, ज्या गोष्टी अविनाशने या पुस्तकांमध्ये सांगितल्या नाहीत, अशा गोष्टीं यामध्ये आहेत. ही प्रस्तावना प्रत्येकाने वाचून काढली, तर त्यांना ते पुस्तक वाचण्याची घाई होईल. विद्यार्थीदशेत अविनाश किती इब्लिस होता, किती बंडखोर होता याचा प्रत्यय येतो. अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व हे या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. असे अनेक किसे या पुस्तकांमध्ये आहे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

लेखक अविनाश महालक्ष्मे यांच्या आई शोभा यांचा सत्कार करताना भारती सरपटवार

 

पुस्तकाचे लेखक अविनाश महालक्ष्मे यांनी या पुस्तक लिखाणामागची भूमिका विशद केली. ते म्हणालेत की, यातील शिरपूरच्या आठवणी केवळ त्या गावापुरत्याच मर्यादित नाहीत. तर त्या सार्वलौकिक आणि सार्वकालिक आहेत. आज इथे खरच मी अक्षरशः भारावून गेलो कारण हा माझ्या जन्मभूमीतला हा आजचा कार्यक्रम आहे. शिरपूरसह परिसरातील माझ्यावर प्रेम करणारे अनेक जण या ठिकाणी आलेत, हे मी माझं भाग्य समजतो. तसं हे माझं चौथं पुस्तक आहे. सन 1992 – 1993 मध्ये मी दृष्टिबाधितांसाठी ऑडिओ दिवाळी अंक काढला होता. घानमाकड पुस्तकाचे प्रकाशक विजय प्रकाशन आहे.

मनोगत व्यक्त करताना पुस्तकाचे लेखक अविनाश महालक्ष्मे

 

पत्रकारिता करायला लागलो तेव्हा माधव सरपटवार खूप आधीपासून इथले एका दैनिकाचे प्रतिनिधी होते. एक असं म्हटलं जातं की परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. पण हे जरी खरं असलं, तरी परिसाची एक अट असते. की ज्याला सोनं व्हायचंय त्यांनं किमान लोखंड असलं पाहिजे. तो जर दगड असेल. तर परीसही काही करू शकत नाही. असे गुरु आम्हाला लाभले सरपटवार, डॉ. अलोणेंसारखे. आमच्याकडे लेखनाचा वारसा आमच्या मातृकुलातून आलेला आहे. दिलीप अलोणे, माझी आई शोभाताई, माझी अमरावतीची मावशी असेल हे सगळे लिहाचये. लेखनाच्या किंवा पत्रकारिता क्षेत्रातच डॉ. दिलीप अलोणे यांच्यामुळे येऊ शकलो.

इतकी वर्ष झालीत मी शहरांमध्ये राहतो. माझा भूतकाळ मात्र ग्रामीण आहे. माझ्या मनामध्ये शहरविरुद्ध ग्रामीण हे द्वंद्व नेहमी सुरू असते. कुठेतरी याची तुलना सुरू असते. ही तुलना सुरू असताना मी अशा निष्कर्षापर्यंत आलो की, ग्रामीण ओलावा मला शहरांमध्ये दिसत नाही. पूर्वीसारखा सामाजिक सद्भाव नाही. आज आपल्याला शेजारी माहीत नसतो. सगळ्यात चांगला धर्म शेजार धर्म आहे. माणसांना जोडणारा तोच धागा खरा आहे. हा खरा धागा सध्याच्या या वातावरणात आपण हरवून बसलो आहे. म्हणून मला असं वाटलं की तो शोधण्याचा प्रयत्न आपण ‘घानमाड’च्या माध्यमातून केला पाहिजे. कुठल्याही खेड्यांमध्ये ही खेडी माझ्या लहानपणी तरी चांगली माणसं घडवणाऱ्या कार्यशाळा होत्या.

महालक्ष्मे यांचा सत्कार करताना डॉ. दिलीप अलोणे व मान्यवर

 

प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांनी अध्यक्षीय भाषणातून अविनाश महालक्ष्मे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणालेत की, या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये श्रीपाद अपराजित यांनी महालक्ष्मे यांच्या अनेक करामती लिहिल्यात. पण अविनाशच्या अनेक करामती मला माहीत आहेत. मी साहित्याच्या प्राध्यापक असल्यामुळे थोडासा त्या दृष्टीने विचार केला की, नेमकं ‘घानमाकड’ काय आहे? आत्मचरित्र आहे काय? नाही, ते आत्मचरित्र नाही. त्या वेळेला माझ्या साहित्याच्या परिभाषेमध्ये हे आत्मवृत्त आहे. त्या बालमनावरती जे जे काही संस्कार झालेत त्या संस्काराचं दर्शन यातून होतं. ते आत्मवृत्त लिहत असताना त्यांनी दोन व्यक्तिचित्रं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. एक वासुदेव मामा आणि एक पांडू. भल्या भल्या थोडा मोठा लेखकांच्या व्यक्तिचित्रांमध्ये जी निरीक्षण नसतील ती निरीक्षण अविनाश यांनी समर्थपणे मांडलीत.

अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. दिलीप अलोणे

 

विचार करतो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे अनेक राजकीय सामाजिक उलथापालथी झाल्यात. महात्मा गांधींनी पहिल्यांदा सांगितलं की खेड्याकडे चला. अनेक लेखक साहित्यिक खेड्याकडे जायला लागले. पण खेड्यातलं काय पाहिलं त्यांनी? खेड्यातले शेत पाहिलेत. शिवार पाहिलं. जोंधळा पाहिला. डोक्यावरती चुंबळी घेऊन जाणाऱ्या तरुणी पाहिल्यात. त्याचबरोबर आमचे ग्रामीण लेखक थांबले. मग हे ग्रामीण जीवन होतं काय? खेड्याकडे जा हा तो संदर्भ होता का? ती खरी गांधींनी सांगितलेली गरज होती का? तर नाही.

शिरपूर येथील व अन्य मित्रांनी केला महालक्ष्मे यांचा सत्कार

 

पूर्वी गवकऱ्यांशी होणारा संवाद जो होता तो संवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. ती भावनिकता कुठेतरी जपलेली आपल्याला दिसत नाही. माणसांमध्ये निव्वळ कोरडेपणा आलेला आहे. या कोरडेपणामध्ये कुठेतरी ओलावा निर्माण करावा म्हणून महालक्ष्मे यांचं ‘घानमाकड’ आहे. म्हणून एक अत्यंत जबाबदारीने विधान करतो की, अविनाश महालक्ष्मे यांचे ‘घानमाकड’ हे ग्रामीण साहित्यामध्ये मोडणारं आहे. हे पुस्तक नव्या येणाऱ्या पिढीला दस्तऐवज म्हणून जो हा संदर्भ ग्रंथ ठरत आहे. ग्रामीण ग्रंथ ठरत आहे.

महालक्ष्मे यांचा सत्कार करताना प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे रवी बेलूरकर, अनिल बिलोरिया

 

जैताई मंदिर, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे रवी बेलूरकर, अनिल बिलोरिया, शिरपूरकर आणि वर्गमित्रांनी यावेळी अविनाश महालक्ष्मे यांचा सत्कार केला. भारती सरपटवार यांनी लेखकाच्या आई शोभा महालक्ष्मे यांचा सत्कार केला. विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालयाद्वारा आयोजित या प्रकाशनसोहळ्याचेसंचालन आणि आभार प्रदर्शन गजानन कासावार यांनी केले. डॉ. ऐश्वर्या अलोणे यांनी गायलेल्या शारदास्तवनाने कार्यक्रमाचा आरंभ तर कुश-लव रामायण गाती या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शारदास्तवन गाताना डॉ. ऐ्श्वर्या अलोणे

Comments are closed.