बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन येथील सरस्वती बाल विद्या मंदीरमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 2 लाखांचा डल्ला मारला. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी गजानन लक्ष्मणराव मुत्तेलवार हे मुकुटबन येथील एका शाळेत शिक्षक आहेत. ते मुकुटबन येथील राममंदिर जवळ त्यांच्या कुटुंबासह राहतात. दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ते पत्नीसह पुणे येथे गेले होते. दरम्यान घराची देखरेख झाडांना पाणी देण्यासाठी येणाऱ्या कामगारिणीकडे सोपवली होती. दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी कामगारिणीला घराच्या दाराचा कोंडा तुटलेला दिसला. त्यांनी याची माहिती शिक्षकांना कळवली.
सायंकाळी शिक्षक घरी परतल्यावर पाहणी केली असता त्यांना मुख्य दार व किचनचे दार तोडलेले आढळले. बेडरुममधील लाकडी कपाट व लोखंडी आलमारी उघडी असून त्यातील नगदी ₹1,60,000, राशीचा खडा असलेली चांदीची अंगठी किंमत ₹32,000, तसेच चांदीच्या पायातील चाळ दोन जोड किंमत ₹5,000 असा एकूण ₹1,97,000 किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
ही चोरी दि. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ते दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता दरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम 305 व 331 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुकुटबन पोलीस पुढील तपास करीत आहेत.



Comments are closed.