बहुगुणी डेस्क, वणी: चार दिवसांआधी झालेली चिखलगाव येथील धाडसी घरफोडीची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आणखी एक घरफोडी केली आहे. नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे एका आर्मी जवानाच्याच घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घरफोडी सुमारे 4 लाख 13 हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे भाडेकरूच्या घराला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी घरमालकाच्या घरी चोरी केली. घर बंद म्हणजे घरफोडी हे एक समिकरणच सध्या वणीत बनले आहे. त्यामुळे ऐन लग्नाच्या व पर्यटनाच्या सिजनमध्ये वणीकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. सध्या चोर सीसीटीव्हीत कैद होत आहेत. मात्र त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सोनू रविंद्र बरडे (29) या नांदेपेरा रोडवरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. त्यांचे पती रवींद्र बरडे हे आर्मीत असून सध्या त्यांची अरुणाचल प्रदेश येथे पोस्टींग आहे. घरी त्या त्यांच्या मुलांसह राहतात. रविवारी सोनू या मुलांना घेऊ भांदेवाडा येथील एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. रात्री त्या त्यांच्या सासरी निंबाळा येथे थांबल्या होत्या. मध्यरात्री त्यांच्या घरात चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या कोंड्याचे स्क्रू काढून प्रवेश केला.
चोरट्यांनी बरडे यांच्या घरातील बेडरूम मध्ये प्रवेश करीत लाकडी कपाटाचे लॉक तोडले. त्यांनी यात ठेवलेले सोन्याच्या दोन गोफ, अंगठी, मंगळसूत्र, डोरले, ईयर रिंग (कानातले) जिवती, बारीक रिंग, चांदीचे चाळ, चांदीचा छल्ला, चांदीचा करदोळा असा सुमारे 4 लाख 13 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यासह घरात आणखी कुठे मौलवान वस्तू आहे का याचा शोध घेण्यासाठी चोरट्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त फेकले.
भाडेकरूंच्या दरवाज्याची कडी लावली
चोरटे संपूर्ण प्लानिंगने बरडे यांच्या घरी शिरले होते. त्यांनी आधीच बरडे यांच्या घरी राहत असलेल्या भाडेकरूच्या घराच्या दरवाज्याची कडी बाहेरून लावली. सकाळी जेव्हा बाहेरून कुणीतरी कडी लावल्याचे भाडेकरूच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी बरडे यांना कॉल केला. त्यांनी घराशेजा-यांना कडी उघडण्यासाठी पाठवले. तेव्हा ही घरफोडीची घटना उघडकीस आली.
घराशेजारील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याची माहिती आहे. सोनू यांनी तातडीने घरफोडीची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला. तसेच डॉग स्क्वॉड व फिंगर प्रिंट एक्पर्टलाही बोलावण्यात आले. या प्रकरणी सोनू बरडे यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 331(4), 305(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
घर बंद म्हणजे घरफोडी !
शहरात दिवसेंदिवस चोरी व घरफोडीच्या घटना वाढतच आहेत. सध्या लग्नाचा सिजन आहे. यासह मुलांना देखील सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक बाहेरगावी जातात. असे घर चोरट्यांच्या रडारवर आहेत. गेल्या 15 दिवसात ही तिसरी मोठी घरफोडी आहे. 15 दिवसांआधी विनायक नगर तर चार दिवसांआधी चिखलगाव येथे घरफोडी झाली आहे. चिखलगाव व लक्ष्मीनगर येथील घरफोडी ही जबरी असून यात चार लाखांपेक्षा अधिकचा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. सध्या जे घर बंद असते ते घर फुटलेच असे एक समिकरण झाले आहे. सातत्याने होणा-या घरफोडीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Comments are closed.