एलटी कॉलेजमध्ये पार पडले युवती मार्गदर्शन शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी युवती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद पोंक्षे, जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रसाद खानझोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एसडीपीओ गणेश किंद्रे होते.

मार्गदर्शन करताना मिलिंद पोंक्षे यांनी मुलींना स्वरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अलिकडच्या काळात मुलींचे फोटो किंवा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकाराने मुली मानसिकरित्या खचून जातात. त्यामुळे मुलींनी सजग राहून जगले पाहिजे. असे ही आवाहन त्यांनी केले. जवळच्या व्यक्तींकडून किंवा नातेवाईकांकडूनही मुलीवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. अशा वेळी मुलींनी घाबरून न जाता आपल्या पालकांना या बाबत कळवावे असे ही ते म्हणाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी महिला अत्याचाराविषयीच्या विविध घटनांचा दाखला देत विद्यार्थीनींना अशा घटनांपासून सतर्क राहावे, तसेच कोणतीही मदत हवी असल्यास न घाबरता 112 वर फोन पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थीनींनी विवेकाने विचार करून पाउल टाकावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला प्रा किसन घोगरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ नीलिमा दवणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ विकास जुनगरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोनल सुरपाम या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments are closed.