धक्कादायक : पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडला खुनाचा थरार

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर तहसील कार्यालयाच्या मागे रविवारी रात्री खुनाचा थरार घडला. दारूच्या नशेत एका महिलेसह तिघांनी अनोळखी इसमाचा डोक्यावर, छातीवर व पोटावर वजनी वस्तूने प्रहार करून संपविले. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेचा वणी पोलिसांनी काही तासातच उलगडा करून आरोपी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. अनिकेत दादाराव कुमरे (21) रा. सिंधी, ता. मारेगाव, मारोती लक्ष्मण कुळमेथे (34) रा. गणेशपुर ता. वणी व रोशनी कंचन भगत (25) रा. पंचशील नगर राजूर कॉलरी असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार वणी तहसील कार्यालयाच्या निर्माणाधीन सभागृहाच्या इमारतीमध्ये अंदाजे 40- 45 वर्ष वयाच्या अनोळखी इसमाचा विवस्त्र मृतदेह सोमवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी आढळला होता. मृतदेहाच्या डोक्यावर तसेच डोळ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने तपास अधिकारी सपोनी राजेश पुरी यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोव्हिजनल पी.एम. रिपोर्ट देण्याचा आग्रह केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात डोक्यावर वजनी वस्तूचा प्रहार तसेच बरगड्या तुटल्यामुळे इसमाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.

अहवालावरून पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून अवघ्या काही तासात आरोपी अनिकेत कुमरे यास दीपक चौपाटी परिसरातून तसेच मारोती कुलमेथे व महिला आरोपी रोशनी भगत हिला तहसील परिसरातून ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींनी दिलेल्या बयानानुसार तिघांना दारू पिण्याच्या व्यसन आहे. रविवारी रात्री महिलेसह तिघं तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान एक अनोळखी व्यक्ती तिथं आळा. आरोपी अनिकेत कूमरे यांनी त्या व्यक्तीला दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागितले. 

त्या अनोळखी इसमाने त्याला शंभर रुपये दिले. मात्र शंभर रुपयांच्या बदल्यात तो महिलेसोबत अंगलट होण्याचा प्रयत्न करु लागला. याच कारणावरून त्याच्या सोबत वाद होऊन आरोपी यांनी त्याच्या पोटावर, छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यावर विटाने प्रहार करून त्याला जिवानिशी संपविले. आरोपीने दिलेल्या कबुलीवरुन वणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरुध्द कलम 302 भादवि अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र खून झालेल्या इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे आदेशावरून एपीआय राजेश पुरी, एपीआय माया चाटसे, एपीआय माधव शिंदे, एएसआय सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, विकास धाडसे, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहे. 

Comments are closed.