तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चारगाव चौकी येथे तीन अज्ञात इसमानी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण केली. सदर घटना दि. 28 सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दारुभट्टी परिसरात घडली. घटनेची तक्रार शिरपूर पोलिसांत नोंदविली आहे. आकाश देविदास चिकराम असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सरपंच सपना सचिन नावडे यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आकाश देविदास चिकराम (28) यांना चारगाव चौकी येथील दारुभट्टी आणि बिअरबार हे विनापरवानगी सुरू आहे, असे सांगत त्याची व्हिडीओ शूटिंग करून आणण्यास सांगितले. त्याअनुषंगाने आकाश सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान सदर दारू दुकानांची व्हिडीओ शूटिंग करीत होता. मात्र यावेळी तिथे तीन अज्ञात लोक पोहोचले व त्यांनी आकाशला हाताबुक्यांनी मारहाण केली.
त्यांनी आकाशला पुन्हा व्हिडीओ काढल्यास मारून टाकीन अशी धमकी देत शिवीगाळ ही केली. यावेळी आकाश सोबत सचिन नावडे, आकाश उईके हजर होते. सदर घटनेची तक्रार आकाश चिकराम यांनी शिरपूर पोलिसात दिली. पोलिसांनी तीन अज्ञात आरोपी विरुद्ध भादंस ३२३, ५०४, ५०६ अनुसार अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दुकानास ग्रामपंचायतीची परवानगी नाही: सरपंच
गाव रहदारीच्या मुख्य रस्त्यालगतच्या शेतात अनिता श्रीनिवास बालागोनीवार यांच्या नावे देशीदारू, वाईन बार सुरू केले. मात्र सदर जागेची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली नाही. नवीन जागेवर दारू दुकान चालू करण्यास ग्रामपंचायत द्वारा कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही. मग हे दुकान वैध की अवैध असा प्रश्न आहे. दारू दुकानास आम्हा सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सदर रस्त्याने गावातील मुलं, मुली शिरपूरच्या शाळेत येजा करतात. एखादया दारू पिणाऱ्याकडून मुलींच्या छेडखानीचा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी सदर दारू दुकान त्वरित बंद करावे. दारू दुकान बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सरपंच: सपना सचिन नावडे, चारगाव
दारू दुकानास ग्रामस्थांचा विरोध, मग पाठबळ कुणाचे ?
चारगाव चौकी येथील दारू भट्टी, बिअरबार रस्त्यालगत असल्याने शासकीय नियमानुसार पाच वर्षांपूर्वी बंद झाले होते. मात्र सदर दारूविक्रेत्यांनी चारगाव ते चौकी दरम्यान मिलमिले यांच्या शेतात गाव वहिवाटीच्या मुख्य रस्त्यालगत बांधकाम करून नुकतेच देशी दारूचे दुकान आणि वाईन बार व्यवसाय सुरू केला. मात्र सदर बांधकाम करताना जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केली नाही. बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही. असा आरोप आहे.
सदर दारुभट्टी आणि बिअर बारला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु सदर दारू विक्रेत्यांनी दुकानाचे रीतसर बोर्ड लावून दारूची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला आहे. गावात दारू दुकानास परवानगी देण्यास संपूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे. असे असताना सदर दारू विक्रीचे दुकान कुणाच्या पाठबळावर सुरू केले. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे सदर दारू दुकानासंबंधी तक्रार केली होती. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दुकान सुरू होऊ देणार नाही. असे ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. मात्र ते सध्या आजारामुळे नागपूरच्या रुग्णालयात दाखल असल्याने ग्रामस्थांचा संपर्क होऊ शकला नाही. ‘गाव करी ते राव न करी’ अशी मराठीत म्हण आहे. मात्र सदर प्रकरणात नेमका विजय कुणाचा होतो ? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)