सावधान… कवडू आलाये ! भुरट्या समाजसेवकाचा हैदोस
समाजसेवेच्या नावाखाली तक्रार करून कर्मचारी, अधिका-यांना दम
बहुगुणी डेस्क: संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना तक्रारीचा अधिकार दिला आहे. मात्र या संवैधिनिक अधिकाराचा गैरवापर करून तक्रार करण्याचे व्यसनच एका भुरट्या समाजसेवकाला लागले आहे. उठ सुट व छोट्या मोठ्या प्रत्येकच गोष्टीच्या तक्रारी करून धमकवण्याच्या त्याच्या सवयीमुळे कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्ग चांगलेच त्रस्त झाले आहेत. शिवाय त्याच्या अनेक निरर्थक तक्रारी या ‘अर्थ’पूर्ण असल्याचेही बोलले जाते. समाजसेवेचा बुरखा पांघरलेल्या या भुरट्या समाजसेवकाचा परिसरात सध्या चांगलाच हैदोस सुरु असून याचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.
कर्मचारी व अधिकारी वर्गात हा भुरटा समाजसेवक ‘कवडू’ नावाने प्रसिद्ध आहे. हा कार्यालयात जातात तिथे ”कवडू आला, कवडू आला” अशी कुजबूज सुरु होते. हा भुरटा, तोतया समाजसेवक स्वत:ला गव्हरमेंट ऍफिलेटेड समाजसेवक म्हणवून घेतो. मी परिसरातील एकमेव अधिकृत समाजसेवक असल्याच्या फुशारक्या मारून तो अधिकारी व कर्मचारी वर्गाला धमकावतो. कर्मचारी किंवा अधिका-याने त्याला उलटे उत्तर दिल्यास मी अधिकृत समाजसेवक असून तुमची नोकरी खातो, बदली करतो. पोलिसांत तक्रार देतो, अशी धमकी हा देतो.
हा भुरटा समाजसेवक स्वत:ला वीवीआयपी समजतो. तो कोणत्याही कार्यालयात आपले काम लगेच झाले पाहिजे अशा अहिर्भावात जातो. काम कायद्यात बसत नसले तरी तो ते काम करण्यास कर्मचा-यावर दबाव टाकतो. एखाद्या कार्यालयीन कामासाठी काही वेळ घालून दिलेला असतो. त्यामुळे कामास वेळ लागेल असे सांगितल्यावर किंवा काम कायद्यात बसत नाही, असे सांगितल्यास हा कर्मचारी अधिका-याला पाहून घेतो अशी धमकी देत त्याची तक्रार करतो. अनेकदा तर हा भुरटा आपल्या कामाचे पैसे इतरांनी भरावे अशी अपेक्षा ठेवून असतो. मात्र तसे न झाल्यास हा तक्रारीचे हत्यार बाहेर काढतो. आज पर्यंत या भुरट्या समाजसेवकाने एकही कार्यालय तक्रार करण्याचे सोडले नाही.
अनेकदा आला महाप्रसादाचा योग !
केवळ सरकारी कार्यालयच नाही तर खासगी कार्यालय देखील या महाभागाने तक्रार करण्याचे सोडले नाही. टपरीवर पोहा खाताना एक्स्ट्रा रस्सा दिला नाही, कर तक्रार. मिटिंगमध्ये समोर बसायला खुर्ची मिळाली नाही, कर तक्रार. इतकचं काय तर एखाद्याने एखाद्या वैयक्तिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, तरी त्याचा राग मनात धरून हा त्याची तक्रार करण्यास धजावत नाही. त्याच्या याच सवयीमुळे त्याला महाप्रसाद मिळण्याचा योग देखील अनेकदा आला होता. मात्र यातून तो अनेकदा वाचला.
एकदा एका अधिका-याला धमकवण्यासाठी या समाजसेवकाने त्या विभागातील अधिका-याची खोटी तक्रार केली होती. मात्र ती तक्रार खोटी असल्याने हे प्रकरण या भुरट्या समाजसेवकावर उलटले. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र यातून त्याने कोणताही धडा घेतला नाही. लोकांना सभ्यतेचे धडे देणारा हा भुरटा कमी शेण खाण्यात देखील मागे नाही. काही वर्षाआधी त्याची एक नातेवाईक एका मोठ्या पदावर होती. तेव्हा त्या विभागाकडून वृत्तपत्राला दिलेल्या जाहिरातीचे कमिशन तो पत्रकारांकडूनच खायचा. असे जुने पत्रकार सांगतात. असा हा खादाड, भुरट्या समाजसेवकाच्या अनेक तक्रारीमागे ‘अर्थ’पूर्ण खादाड मनसुबा असल्याचे बोलले जाते.
कवडूचे अनेक किस्से प्रसिद्ध
या भुरट्या समाजसेवकाचे अनेक किस्से लोक चवीने सांगतात. एकदा हा भुरटा समाजसेवक एका कार्यालयात गेला होता. तिथे त्याचे अचानक पोट झोंबले. त्याने कार्यालयातील एका कर्मचा-याला वॉशरुम बद्दल विचारले. कर्मचा-याने बोट दाखवून त्याला वॉशरुम कुठे आहे हे दर्शवून सांगितले. मात्र तिथे हा गेल्यावर तिथे केवळ मुतारी होती. तो टॉयलेट शोधत होता. मात्र दिसले नाही. काही वेळाने हा तिथून आकांततांडव करीत बाहेर आला. कर्मचा-यांवर ओरडू लागला. बघून घेईन म्हणू लागला. दुस-या दिवशी या भुरट्याने त्या कार्यालयात टॉयलेट नसल्याची तक्रार केली. मात्र कार्यालयात त्या दिवशी या तोतया समाजसेवकाची टॉयलेट नसल्याने चड्डी पिवळी झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. तेव्हापासून हा हागल्या मुतल्या तक्रारी करतो, अशी प्रसिद्धी त्याला पंचक्रोशीत मिळाली.
ऍट्रोसिटीच्या नावाने धमकी
एट्रोसिटी हा अन्याय अत्याचाराविरोधात दिलेले एक हत्यार आहे. मात्र याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न हा भुरटा समाजसेवक करतो. कधी अधिकारी, कर्मचारी तर कधी सर्वसामान्यांशी हा हुज्जत घालतो. कोणत्याही प्रकरणाला धार्मिक किंवा जातीय रंग देणे हा या भुरट्याचा आवडता छंद आहे. तुम्हाला पाहून घेतो, पोलिसात तक्रार देतो अशी धमकी देतो. कुणी कर्मचारी, अधिकारी किंवा एखाद्या व्यक्तीने या भुरट्याच्या धमकीला भिक घातली नाही तर हा त्यांना ऍट्रोसिटी करण्याची धमकी देत असल्याचेही बोलले जाते. याला दुसरे कुठले काम नसल्याने अनेक कर्मचारी व अधिकारी याच्या तोंडाला लागत नाही.
समाजात लुच्चा म्हणून स्थान
हा भुरटा समाजसेवक समाजात माझा खूप मानपान असल्याची बतावणी करतो. मात्र त्याला प्रत्येक ठिकाणाहून पार्श्वभागावर लाथ मारून हाकलण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे हा जिथे जाणार तिथे काम बिघडणार व भांडणं होणार हे समीकरणच बनले आहे. त्यामुळे सार्वजनिक धार्मिक, सामाजिक उपक्रमातून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. समाजातील वैचारिक, राजकीय विरोध असलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी करण्यात हा सर्वात पुढे असतो. अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यकर्त्यांच्या याने विनाकारण तक्रारी करून त्यांना त्रास दिला आहे. अनेकदा तर केवळ वैचारिक विरोध करण्याच्या कारणावरून हा पोलिसात तक्रार देण्यासही मागे पुढे पाहत नाही.
धमकी व तक्रारीच्या जोरावर त्याने अनेकांना माफी मागण्यास भाग पाडले. मात्र माफी मागितल्यानंतर हा त्याला कसे लोळवले अशा डिंगा पिटत फिरत असतो. विशेष म्हणजे त्याचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय तो पूर्णपणे कायद्याला धरून करतो, असे नाही. मात्र कुणाच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर कशाला पाय द्यायचा, या भावनेतून त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र त्याचे तक्रार करण्याचे व्यसन हे विकृती पर्यंत पोहोचले आहे. अशा भुरट्या समाजसेवकाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरीत आहे.
Comments are closed.