शाळा क्र 8 चे मुख्याध्यापक बंडूजी कांबळे सेवानिवृत्त

मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यादानाच्या सेवेबाबत सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 या शाळेचे मुख्याध्यापक (उच्च श्रेणी) बंडूजी कांबळे हे आज सेवानिवृत्त झाले. सुमारे 35 वर्ष त्यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. आज शुक्रवारी दिनांक 1 एप्रिल रोजी शाळेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

2 नोव्हेंबर 1987 रोजी बंडूजी कांबळे हे शिक्षक म्हणून नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये रुजू झाले होते. 1993 पासून ते शाळा क्रमांक 8 मध्ये रूजू झाले. पुढे याच शाळेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. सुमारे 29 वर्ष त्यांनी याच शाळेत सेवा दिली. प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवारी ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आज बंडूजी कांबळे यांच्या सत्कार व निरोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात गिरिधर चवरे, धनराज भोंगळे, प्रतिभा मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चौधरी यांनी केले तर सुनीता जकाते, नीलिमा राऊत व किरण जगताप यांनी स्वागत गीत सादर केले.

या प्रसंगी कांबळे यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. किशोर परसावार, गजानन कासावर, वसंत गोरे या मुख्याध्यापकांनी यावेळी मनोगत व्यक्त करत कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी भविष्य निर्वाह निधीचा चेक कांबळे यांच्याकडे सुपुर्द केला.

कार्यक्रमाला नगरपालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद, शिककेत्तर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र खरवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविनाश तुंबडे यांनी मानले.

हे देखील वाचा:

गुडीपाडवा समर सेल… सर्वोत्कृष्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत

‘नाम’चा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

 

Comments are closed.