मुकुटबन – बोगस डॉक्टरचा भांडाफोड, ग्रामपंचायत समोर थाटला दवाखाना

वैदकीय पदवी नसताना अनेक वर्षांपासून करीत आहे रुग्णांवर उपचार

जितेंद्र कोठारी, वणी : कुठलीही वैदकीय पदवी नसताना अगदी ग्रामपंचायत कार्यालयसमोर दवाखाना थाटून अनेक वर्षांपासून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाने कारवाईचा इंजेक्शन दिला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी झरी तालुक्यातील मुकुटबन येथे बोगस बंगाली डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून एलोपेथी औषधांसह साहित्य जप्त केले. तापस नारायण गाईन (34) असे बोगस बंगाली डॉक्टरचे नाव आहे.

मुकुटबन येथे ग्रामपंचायत कार्यालयजवळ एक व्यक्ती दवाखाना थाटून अवैधरित्या वैदकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांना मिळाली होती. माहितीवरून डॉ. मोहन गेडाम, वैदकीय अधिकारी डॉ. अतुल पवार, डॉ. संतोष गोफणे, डॉ.जीवन कुळमेथे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान, पोलीस अंमलदार मंगेश सलामसह बुधवार 11 ऑक्टो. रोजी सायंकाळी 7.30 वाजता धाड टाकली. पथकाने त्याच्या दवाखान्यातून एलोपेथी औषधसाठा, इंजेक्शन व सलाईन जप्त केले. फिर्यादी डॉ. मोहन करनोजी गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी झरीजामणी यांच्या फिर्याद वरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध महाराष्ट्र वैदकीय व्यवसाय कायदा 1961चे कलम 33(1), 33(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा देखावा आणि दवाखाना पुन्हा सुरु

बोगस डॉ. तापस गाईनवर मुकुटबन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र कारवाईच्या दुसऱ्या दिवशीच सदर बोगस डॉक्टरने दवाखाना सुरु करून रुग्णांवर उपचार करण्यास सुरु केले. काही वर्षांपूर्वीसुद्धा याच डॉक्टरवर आरोग्य विभागाने कारवाई केली होती. मात्र आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून डॉ. गाईन यांनी पुन्हा अवैधरित्या वैदकीय व्यवसाय सुरु केले. मुकुटबन ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी समोर दवाखाना थाटून मागील अनेक वर्षांपासून वैदकीय व्यवसाय करणाऱ्या या डॉक्टरला आरोग्य विभागाचाच वरदहस्त असल्याचे बोलले जाते.

Comments are closed.