वणी उपविभागात मुसळधार पाऊस, शेतीचे नुकसान

संजय खाडे यांचे निवेदन, तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपायीची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका आठवड्यापासून वणी तालुक्यात पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा नदीलगत असलेल्या शेतींना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे घोन्सा, शिवनी, चिंचोली, सावंगी, मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव, चिखली, टाकळी, येनक, येनाडी, एकार्जुना, शिंदोला, नायगाव, कैलासनगर इत्यादी गावातील शेती प्रभावित झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अद्यापही पंचनामा झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करावा. तसेच शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी निवेदनातून केली. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

वणी तालुक्यातील शेलु, रांगणा, भुरकी, वडगांव, झोला, कोना, जुनाड, चिंचोली, कवडशी, सावंगी, उकणी या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. पूर आला की या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी पावसाचा जोर बघता योग्य ती उपाययोजना तात्काळ करावी. अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, पवन शा. एकरे, तेजराज बोढे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.