उकणीत शिरला रानडुकरांचा झुंड, गावाच्या वेशीवर आला वाघोबा…

महिला थोडक्यात बचावली... सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, गावात दहशत

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी सकाळी उकणी गावात रानडुकरांचा झुंड शिरला. मात्र प्रसंगवधान राखल्याने एक महिला थोडक्यात बचावली. सध्या गावा जवळ वेकोलिच्या डम्पिंगजवळ वाघाचे पगमार्क्स आढळल्याने वाघाने पाठलाग केल्याने रानडुकराच्या झुंडीने पळ काढला असावा, असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या वाघ गावाच्या वेशीवर आला असल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

उकणी गावाची पूनर्वसनाची प्रक्रिया अद्यापही बाकी आहे. गावाजवळ वेकोलिच्या खाणी असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिचे डम्पिंग आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढली आहेत. उकणी जवळच जंगलाचा परिसर आहे. तसेच परिसरातून वर्धा नदी वाहते. त्यामुळे या भागात अनेकदा वाघांचा मुक्त संचार असल्याचे आढळले आहे. अनेकदा वाघाने परिसरातील पशूवर देखील हल्ला केला आहे. तर उकणीजवळ एक वाघ मृतावस्थेत देखील आढळला होता.

गावकरी दहशतीत
गावाच्या वेशीवर असलेल्या बस स्टॉपजवळ असलेल्या डम्पिंग परिसरात काही नागरिकांना वाघाचे पगमार्क्स आढळले आहे. कदाचित रानडुकरांच्या झुंडीचा वाघाने पाठलाग केल्याने झुंड गावात शिरला असा अंदाज देखील व्यक्त होत आहे. डम्पिंगजवळ झालेल्या केरकच-यामुळे वाघाचा या ठिकाणी वावर असतो, असा आरोप गावकरी करीत आहे. त्यामुळे वेकोलिने व वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या रानडुकरांचा झुंड गावात शिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज चांगलेच व्हायरल होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.