बहुगुणी डेस्क, वणी: आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने जग चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचत आहे नवनवे तंत्रज्ञान विकसित होत आहे नवनवीन प्रयोग आणि संशोधन होत आहे तरीही वर्तमान काळात अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि त्यातून बळी पडणारे तर वाढतच आहेत अशाच घटनेचा बळी पडलेल्या एका व्यक्तीचा लुटलेला सर्व मुद्देमाल वणी पोलिसांनी चातुर्य आणि तत्परतेनं परत मिळवून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अंतरगाव येथील फिर्यादी विजय महादेव टोंगे (44) त्यांना नागपूर जिल्ह्यातील कवठा येथील कृष्णा कन्हैया येधानी (27) आणि नागपूर जिल्ह्यातीलच आसोला सावंगी येथील जितेंद्र जीवन राठोड (29) या दोन आरोपींनी विजय टोंगे यांना आपल्या ‘घेऱ्यात’ घेतलं. टोगे यांना गुप्तधनाचं आमिष दाखवलं. मात्र झालं भलतंच. या दोन आरोपींनी गुप्तधन शोधण्याच्या सबबीखाली टोंगे यांच्याकडचे 1 लाख 50 हजार रूपये रोख आणि 90 हजार रूपये किमतीचा 11.340 ग्रॅम वजन असलेला सोन्याचा नेकलेस हडपला.
यात टोंगे यांची एकुण 2 लाख 40 हजार रूपयांची लुबाडणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच टोंगे यांनी 16 मार्च 2025 ला पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल झालेत. पोलीस लगेच जलद गतीने कामाला लागलेत. तपासाची चक्रे फिरू लागलीत. आणि पोलीसांनी काही दिवसांतच आरोपींना ताब्यात घेतलं. मा. न्यायालयाने 9 एप्रिलला फिर्यादीचा मुद्देमाल परत करण्याचा आदेश दिला. आदेशानुसार वणी पोलिसांनी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या हस्ते फिर्यादी विजय टोंगे यांना पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश अपसुंदे आणि पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने उपस्थित होते. लुटलेलं सगळं धन पोलिसांच्या तत्परतेनं परत मिळाल्यानं फिर्यादी विजय टोंगे यांनी वणी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. (वाचा गुप्तधनाची सविस्तर बातमी)
Comments are closed.