करू मराठीचीच भक्ती, मागे हटली हिंदी सक्ती, मनसेचा जल्लोष

'मराठी शक्तीचा व एकजुटीचा विजय' मुसळधार पावसातही साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मातृभाषा हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्रात मराठीच सर्वोच्च राहिली पाहिजे. तिच्यावर अन्य कोणत्याही भाषेची मक्तेदारी नको. भर पावसातही याच भावना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांधून ओसंडून वाहत होत्या. कारण त्यांच्यासाठी तो मराठीच्या पुनर्विजयाचा दिवस होता. महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णय होता.

त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र तत्पूर्वीच राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केलेत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल, ताशांच्या गजरात व फटाक्याच्या अतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याबाबत काढलेले दोन्ही जीआर (शासकीय निर्णय) रद्द केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला ‘मराठी शक्तीचा व एकजुटीचा विजय’ म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यानुसार नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती त्रिभाषा सूत्राचा, माशेलकर समितीचा अहवाल आणि विविध मतांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाचे निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. त्यांच्यासाठी मराठी आणि मराठी विद्यार्थी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मनसेने कोणत्याही समितीची बाजू ग्राह्य धरून हा निर्णय महाराष्ट्रात चालू देणार नाही. असे परखड मत मांडत हिंदी सक्तीला तीव्र विरोध कायम ठेवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारची संयुक्त पत्रकार परिषद झाली. वरील दोन्ही शासन निर्णय मागे घेण्यात आल्याचं त्यात जाहीर केलं. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पावित्र्याला यश आले आहे. याच यशाचा आज मनसेकडून सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे. असे कळवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व मराठी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्यात. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, अमोल मसेवार, मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, विलन बोदाडकर, अज्जू शेख, जितू शिरभाते, विठ्ठल हेपट, लक्की सोमकुंवर, हिरा गोहोकार, बंटी धानोरकर, राहुल देवनपल्लीवार, मयूर मेहता, कृष्णा कुकडेजा यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.