मेंढोली येथील पारधी समाजाच्या संपूर्ण मागण्या होतील मान्य
प्रशासनाला उपोषणाचा धसका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनाला यश
पुरषोत्तम नवघरे, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून मेंढोली येथील पारधी समाज त्यांच्या न्याय्य व मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सरसावला. मेंढोली ग्रामपंचायतीसमोर पारधी समाजाचे दोन पुरुष व दोन महिला अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेत. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक २८ एप्रिलला प्रशासनानं झुकतं माप घेतलं. पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, हे निश्चित झालं आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या उपस्थितीत कॉ. मनोज काळे व कॉ. प्रकाश घोसले यांच्या नेतृत्वात मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनिता घोसले यांनी सुरुवात केली. यावेळेस कॉ. मोहरमपुरी यांनी उपस्थित पारधी समाजबांधवांना मार्गदर्शन केलं. मेंढोली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक हेदेखील यावेळी हजर होते. त्यांनी पारधी कुटुंबांची घरे नियमानुकुल करून घरकुल प्रस्ताव मंजूर करून वरिष्ठांकडे पाठविल्याचं सांगितले.
मागील एक वर्षापासून पारधी समाज आपल्या मागण्या प्रशासनाकडे रेटत होता. परंतु प्रशासनाच्या धिम्या गतीचा कारभारामुळे पारधी समाजाचा प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पारधी समाजातील २४ परिवार गेल्या १५ ते २० वर्षांपासून मेंढोली येथील स्मशानभूमीजवळ गट नं ३६ वर झोपड्या बांधून राहत होते. जंगल हेच त्यांच्या उपजिविकेचं साधन आहे. पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी मेंढोली येथे शेती व्यवसाय करून आपली गुजराण करीत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मुलांना शिक्षण देत आहेत. त्यासाठी मात्र ह्या लोकांना प्रशासनाकडून जमिनीचा हक्क, रेशन कार्ड, गाव नमुना ८ अ, घरकुलाचा लाभ आदींची गरज आहे. प्राथमिक कागदपत्रे असल्याशिवाय पुढील शासकीय कागदपत्रे मिळू शकत नाहीत. परिणामी मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ ते घेऊ शकत नाहीत.
अनेक त्रुटी काढून प्रशासन टाळाटाळ करत होते. अखेर पारधी समाजाला त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील या उपोषणाचा धसका प्रशासनानं घेतला. स्थानिक ग्रामपंचायतीनं तसंच तहसील प्रशासनानं मागण्यांची पूर्तता करीत असल्याचं व त्या दिशेनं प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. प्रशासनाच्या वतीनं उपोषण मंडपी येऊन लेखी आश्वासन मंडळ अधिकारी बांगडे यांनी दिलं. उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता झाली.
Comments are closed.