आदर्श विवाह: तरुणाने केले विधवेशी लग्न

वणीतील हनुमान मंदिर येथे पार पडला आदर्श लग्न सोहळा... एका अपत्याचा स्वीकार करत संदीपने ठेवला समाजापुढे आदर्श

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऐन तारुण्यात तिच्यावर विधवा होण्याची वेळ आली. मुलगी एकटी असल्यास तिचा पूनर्विवाह होणे कठिण नसते. मात्र अपत्य असले की तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा विधवा मुलीशी लग्न करण्यास कुणी तयार नसल्याने तिला संपूर्ण आयुष्य वैधव्यात घालवावे लागते. मात्र एका तरुणाने या कार्यासाठी पुढाकार घेऊन अपत्य असलेल्या एका विधवेशी विवाह करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. वणी येथील जत्रा रोडवरील हनुमान मंदिर येथे सोमवारी दिनांक 2 जानेवारी रोजी हा आदर्श विवाह पार पडला. संदीप ताजणे असे या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की साक्षी प्रकार एकरे ही वरोरा तालुक्यातील चारूर खर्डी येथील रहिवासी आहे. तीन वर्षांआधी तिचा एका तरुणाशी थाटामाटात विवाह पार पडला. साक्षी व तिच्या पतीचा संसार सुरळीत सुरू होता. त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक गोंडस फुल देखील उमलले. मात्र गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या संसारात एक वेगळेच वळण आले. साक्षीच्या पतीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ऐन तारुण्यात विधवापण साक्षीच्या वाटेला आलं. त्यातच एक चिमुकलाही सोबत.

संदीप प्रभाकर ताजने हा वरोरा तालुक्यातीलच एकोना येथील रहिवासी आहे. तसा संदीप हा गरीब घरचाच. शेतमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. मात्र तो होतकरू आहे. त्याच्या विवाहाकरिता वधूचा शोध सुरु होता. दरम्यान एका परिचितांकडून त्याला एका विधवेशी लग्नाचा प्रस्ताव आला. त्याला याबाबत कळताच त्याने याबाबत विचार करण्यास सुरूवात केली. दरम्यान गावातील काही मंडळी व नातेवाईकांनी यासाठी पुढाकार घेतला.

अखेर त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला व अपत्याला स्वीकारण्याचीही तयारी दाखवली. 2 जानेवारीला वणीतील जत्रारोडवरील हनुमान मंदिर येथे त्यांचा हा आदर्श विवाह जवळच्या नातेवाईक व आप्तजणांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गावातील अरुण निखाडे, गणेश चापले (सरपंच, एकोना), रवींद्र गौरकर, वासुदेव ठाकरे, श्रीकृष्ण उरकुडे, भारी चवले, विनोद चौधरी, पंडीत शिवा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी नवदाम्पत्यास आशीर्वाद देऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संदीपने आपल्या कृतीतून समाजापूढे एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत कौतुक होत आहे.

Comments are closed.