बहुगुणी डेस्क, वणी: सुकणेगाव फाटा व 18 नंबर पुलिया हा अवैध दारुविक्रीचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील तरुण, वृद्ध सर्वच व्यसनाच्या आहारी जात आहे. अखेर महिलांनीच अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. महिलांनी दारु तस्करावर धावा बोलताच आरोपीची चांगलीच घाबरगुंडी उडाली व त्याने हातातील दारूची पिशवी तिथेच टाकून पळ काढला. ही घटना शुक्रवारी दिनांक 28 फेब्रवारी रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास सुकणेगाव फाट्याजवळ घडली.
वणी-मुकुटबन मार्गावरील 18 नंबर पूल आहे. याच्या जवळच उमरी व सुकणेगाव फाटा आहे. वणीहून या ठिकाणी 3-4 तरुण येतात. ते या ठिकाणावरून देशी दारूची अवैधरित्या विक्री करतात. या दोन्ही ठिकाणाहून सकाळपासून ते रात्री उशिरा पर्यंत दारुची अवैधरित्या विक्री सुरु असते. संध्याकाळी या भागाला एका दारूभट्टीचे स्वरुप येते. आजूबाजूच्या गावातील लोक येथे येऊन दारूची खरेदी करतात. केवळ सुकणेगाव, उमरीच नाही तर परिसरातील इतर गावातील रहिवासीही यामुळे त्रस्त झालेत.
सुकणेगाव येथील महिलांचा धावा
अलिकडेच अनेक कोवळे व तरुण मुलं देखील व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. अखेर गावातील महिलांनीच तस्कराला धडा शिकवण्याचा निर्धार केला. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास गावातील महिला, उपसरपंच विजय पावडे व उमरी येथील सरपंच हे सुकणेगाव फाट्याजवळ पोहोचले. तिथे त्यांना दोन तरुण दारू विक्री करताना दिसले. तस्कर दिसताच महिलांनी तस्करांवर धावा बोलला. उग्र रुप धारण केलेल्या महिला अंगावर येताना दिसताच तस्कराने हातातील दारू असलेली पिशवी तिथेच टाकली व त्याने तिथून धूम ठोकली.
महिलांनी याची माहिती पोलिसांना दिली. यावेळी वणी पोलिसांचे पथक मुकुटबन रोडवर पेट्रोलिंग करीत होते. माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नायलॉन पिशवीत असलेल्या देशी दारुच्या 90 मीलीच्या 100 नग घटनास्थळावरून जप्त केल्या. याची किंमत 3475 रुपये आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला. 18 नंबर पुलिया जवळ देखील मोठ्या प्रमाणात दारूची अवैधरित्या विक्री होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही होत नाही, अशी सुकणेगाव व परिसरातील गावातील महिलांची तक्रार आहे.
Comments are closed.