बहुगुणी डेस्क, वणी: दारू पिणारे दारूचं जुगाडं कसंही आणि कुठुनही करतात. वैध दारू विक्रीची दुकाने आणि वेळा ठरलेल्या असतात. मात्र अवैधरीत्या कुठेही आणि कधीही दारू मिळते. अशीच दारूची अवैध विक्री टागोर चौक, गणेशपूर रोड येथे सुरू होती. वणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 41 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल गजानन शत्रुघ्न कुडमेथे यांना दारूच्या अवैध विक्रीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. केसुर्ली येथील आरोपी सदानंद अशोक पथाडे (24) ) आणि वणीतील रंगनाथ नगर येथील आरोपी राकेश खरे (20) हे विनापरवाना विदेशी दारूची विक्री करीत असताना आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 9,120 रुपये), रमच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 6,960 रुपये) आणि एमएच 29 एस 846 क्रमांकाची जुनी हिरो होंडा मोटारसायकल (अंदाजे किंमत 25,000रुपये) असा एकूण 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सीमा राठोड करत आहेत.ही कारवाई वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पो. कॉं. गजानन यांनी केली.
हेदेखील वाचा …
Comments are closed.