जितेंद्र कोठारी, वणी: चारगाव-घुग्गुस मार्गे चंद्रपूरला जाणारी तब्बल 10 लाखांची देशी दारू विशेष पोलीस पथकाने जप्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन दारू तस्करांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चार दिवसांआधीच एक विशेष पथक नेमले होते. या विशेष पोलीस पथकाची ही पहिलीच धडक कारवाई आहे. अलीकडे दारू तस्करीविरोधात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चारगाव मार्गे देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय सूचना विशेष पोलीस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने 4 जून रोजी रात्री 10.30 वाजता चारगाव चौकी येथे नाकाबंदी केली. दरम्यान एक महिंद्रा पिकअप वाहन त्यांना येताना दिसले.
वाहनांची झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या पेट्या भरून होत्या. पोलिसांनी दारू तस्करी करणारे दोन आरोपींना अटक केली. नंदेश्वर तात्याजी काळे (27) रा. जगदंबा देवस्थान, गणेशपूर वणी व हरीश पुरुषोत्तम किरणकर (22) रा. कोरंबी (मा.), ता. वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा पिकअप वाहनासह 10 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, पोहवा. राजू नायक, शिपाई मुकेश करपते, मिथुन राऊत व वाहन चालक महेश यांनी पार पाडली.
हे देखील वाचा: