छळाची अवदसा कधी जाईल, तिच्या जेवणातही फिनाईल…

विवाहितेला अनोख्या पद्धतीने मारण्याचा प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, मारेगाव: ती जातीवाली नसल्याने सासरच्यांना हुंडा मिळाला नाही. मग सासरच्यांनी तिला घरून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. तिच्या सहनशक्तीची परीक्षाच होती ती. त्यातही हद्द म्हणजे तिच्या जेवणात चक्क फिनाईल टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्नही सासरच्या लोकांनी केला. सुनेच्या सहनशक्तीचा उद्रेक झाला. अखेर सुनेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पती, सासू, सासरे व तीन नणंदांविरोधात मारेगाव पोलिसात सुनेने तक्रार दाखल केली. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हे दाखल झालेत.

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील मुलीशी मारेगाव येथील सतीश श्रीधर सिडाम याच्याशी फेब्रुवारी 2022 रोजी आंतरजातीय विवाह झाला. सर्वच नवदांपत्यांसारखा त्यांच्या जीवनाचा आरंभ झाला. मग कालांतराने तिला माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावणे सुरू झाले. त्यात ती जातीची नसल्याने सासरच्यांचा हुंडा बुडाल्याचंही म्हटलं जाऊ लागलं. याच सबबीखाली तिला १ लाख रूपयांची मागणी होऊ लागली. आरोप, धमक्या, मारहाण असे प्रकारही होऊ लागलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिच्यावर सासरचे संशय घेऊ लागलेत. घरून निघून जाण्याच्या धमक्या व मारहाण होऊ लागली. जेवणात फिनाईल द्रव्य टाकून फासावर लटकवित जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हेतर तलवारीने मारून टाकू, मी पाहून घेतो अशी सासरा श्रीधर सिडामने धमकीही दिली. हे सगळं असह्य झाल्यानं तिने आपल्या छळाची कहाणी, तिला सोशल मिडीयावरून धमकी आणि बदनामीकारक संदेश तिचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ हे सगळं पोलीसांपुढं मांडलं.

फिर्यादीच्या तक्रारवरून आरोपी पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू तारा श्रीधर सिडाम, नणंद पूजा श्रीधर सिडाम, मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांच्या विरोधात विवाहसंबंधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिकरीत्या कट रचण्याचा प्रयत्न करण्याचे कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Comments are closed.