आजपासून जैताई नवरात्र महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन

2 ऑक्टोबर रोजी लेखिका अरुणा सबाने यांना जैताई मातृगौरव पुरस्कार प्रदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैताई देवस्थानात आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर पासून सुरू होणारे कार्यक्रम 5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. यात संगीत, भजन, कीर्तन, जागरण, व्याख्यान इत्यादींचा समावेश आहेत. 2 ऑक्टोबर रोजी संवेदनशील लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना जैताई मातृगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

आज मंगळवारी रात्री 8 वाजता मुकुंदबुवा देवरस यांचे कीर्तन होणार आहे. जैताई देवस्थानचे प्रथम पुजारी स्व. साधुबुवा संताने यांच्या स्मरणार्थ हे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या छायाचित्रांचे अनावरणही केले जाणार आहे. दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी डॉ. उत्तम रुद्रावार व प्रकाश एदलाबादकर यांचे पसायदान व संत मुक्ताबाई या विषयावर व्याख्यान होणार आहे.

29 सप्टेंबर रोजी पांढरकवडा येथील स्वरसाधना मंडळातर्फे सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालयाच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला आहे. 3 ऑक्टोबर रोजी कोमल निनावे यांचा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजय चोरडिया यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

अरुणा सबाने यांना जैताई मातृगौरव पुरस्कार
संवेदनशील लेखिका, समाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना यावर्षीचा जैताई मातृगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2 ऑक्टोबर रोजी वनराई प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. संवेदनशिल लेखिका अशी ओळख असलेल्या अरुणा सबाने या मानवाधिकार, हुंडाविरोधी, महिला, दलित अत्याचार विरोधी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यांचे मुन्नी, विमुक्ता या कादंबरीसह सूर्य गिळणारी मी हे आत्मचरित्र देखील प्रकाशित झाले आहे. याआधी साधनाताई आमटे, सिंधूताई सपकाळ, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. राणी बंग, सुचेता धामने, डॉ. सीमा साखरे, मेधा पाटकर, मंदाकिनी आमटे यांना जैताई मातृगौरव हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्व कार्यक्रम हे रात्री 8 वाजता सुरू होणार असून संध्याकाळी 6.30 वाजता सामूहिक आरतीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन जैताई देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.