पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहराची ग्रामदेवता म्हणजे जैताई. इथला अश्विन आणि चैत्र नवरात्रौत्सव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोन्ही नवरात्रांत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी असते. इथल बहुप्रतीक्षित चैत्र नवरात्रौत्सव सोमवार दिनांक 31 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत होत आहेत. हे सर्व कार्यक्रम रोज सायंकाळी 7 वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात होतील.
शहराला कीर्तनाची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत दिनांक 31 मार्च, 2 व 3 एप्रिलला नागपूर येथील कीर्तनकार ह..भ.प.मकरंद हरदास, नूपूर देशपांडे व वर्षा मुलमुले यांची कीर्तने होतील. मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे सहाय्यक संपादक अविनाश महालक्ष्मे यांच्या ‘घानमाकड’ या लेखकाच्या शिरपूर येथील ग्रामीण जीवनातील अनुभवांवर आधारीत पुस्तकाचे पुनर्प्रकाशन होईल. वणीकर मित्रांच्या आग्रहाखातर मूळच्या मुकुटबनच्या डॉ. संध्या पवार नागपूर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी चिटणवीस सेंटर, नागपूर प्रस्तुत ‘नात्यातील गाणी’ हा अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम शुभदा फडणवीस व रवींद्र दुरुगकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संहिता उदयन ब्रह्म यांची आहे. पुस्तक प्रकाशन व अभिवाचनाचा कार्यक्रम स्थानिक विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितआहे.
दरवर्षी पू.मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी होणारा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी होणार आहे. या विशेष स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमात लोकबिरादरी प्रकल्प, हेमालकसा येथील अनिकेत व समीक्षा आमटे या दांपत्याला त्यांच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागातील अबोल व अजोड शैक्षणिक कार्याबद्दल प्राचार्य राम शेवाळकर स्मृती ‘शिक्षणव्रती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार त्यांना नागपूर येथील ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 11,000 रूपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे. या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने माधव सरपटवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
Comments are closed.