जल्लोषात निघाली शोभायात्रा, आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्यवृंदांनी भरले रंग

शिवतांडव, गोंडी ढेमसा ठरले प्रमुख आकर्षण, घडवले लोकसंस्कृती, लोककलेचे दर्शन

निकेश जिलठे, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही शोभायात्रा शहरातून निघाली. या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नयनरम्य देखावे, कलापथक, रोशनाई, बँडपथक यांच्या साथीने निघालेल्या या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिवतांडव व गोंडी ढेमसा नृत्य हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘जय कन्हैया लाल की’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. गेल्या आठवड्यापासून वणीत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेने जन्माष्टमी सप्ताहाची सांगता झाली. या संपूर्ण उत्सवाला वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी वणीकरांचे आभार मानले.  

मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी स. 11 वाजता अमृतभवन येथे दहिहंडी व गोपाळकाल्याचे आयोजन करण्या आले. त्यानंतर महाप्रसाद झाला. संध्या. 6 वाजता अमृत भवन येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. रॅलीतील बग्गीमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विराजमान झाले होते. शेकडो चिमुकले शोभायात्रेत बाळकृष्ण आणि गोपिका बनून सहभागी झाले होते. वाजत गाजत अमृतभवन येथून निघालेली ही शोभायात्रा इंदिरा चौक, खाती चौक, गांधी चौक असे मार्गकर्मण करत शहरातून निघाली. घरासमोर रांगोळी काढून नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले. 

विविध देखावे व गोंडी ढेमसा ठरले प्रमुख आकर्षण
शोभायात्रेत असलेले कलापथक हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक चौकात कला पथक वेगवेगळी वेषभूषा धारण करून आपली कला सादर करत होते. यावेळी महादेवाचे विविध रुपं वणीकरांना पाहायला मिळाले. शिवतांडव या नृत्याने विशेष दाद मिळवली. कोलकाता येथील महाकाली मातेने देखील शोभायात्रेत दर्शन दिले. या देखाव्याने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर गोंडी ढेमसा या पथकाने शोभायात्रेत चांगलीच रंगत आणली. भजनी मंडळाने वातावरण भक्तीमय केले. शोभायात्रेत असलेल्या दांडिया पथकाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यावेळी समितीच्या महिला सदस्यांनी यात सहभागी होत आनंद द्विगुणीत केला. छत्रपति ढोल पथकाने वणीकरांचा उत्साह शेवटपर्यंत कायम ठेवला. डॉ. संकेत अलोणे यांनी साकारलेले अश्वारुढ श्रीकृष्णाच्या वेशभूषेला वणीकरांनी चांगलीच दाद दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर गांधी चौकात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा मार्गक्रमण करताना घराच्या माडीवरून, गॅलरीवरून लोकांनी या नयनरम्य दृष्यांचा आनंद घेतला. वणीतील सर्वात मोठी रॅली असे या रॅलीचे वर्णन केले गेले. शोभायात्रेची सांगता टिळक चौक येथे झाली. शांततेत मात्र उत्साहात निघालेल्या या रॅलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या शोभायात्रेत शहरातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. या वर्षी महिलांचा सहभाग उल्लेखणीय होता. विशेष म्हणजे सर्व स्वयंसेवक हे ड्रेसकोडमध्ये होते. भव्य दिव्य असून शिस्तबद्धतेत निघालेली ही रॅली वणीच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली. शोभायात्रेच्या सांगते वेळी विजय चोरडिया हे भावूक झाले होते. 

वणीकरांचे धन्यवाद – ऍड कुणाल चोरडिया
तरुणांनी श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर हे उत्सवाचे तिसरे वर्ष आहे. जन्माष्टमी निमित्त संपूर्ण आठवडा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कालावधीत वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्सवात रंग भरले. सर्व वणीकरांचे मी उत्सव समितीतर्फे आभार मानतो. तसेच वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला त्यांचे ही आभार. या पुढेही समितीद्वारा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. 
– ऍड कुणाल विजय चोरडिया, अध्यक्ष: श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टी समितीचे सचिव उमेश पोद्दार, कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी, उपाध्यक्ष अनिल रेभे, विशाल दुधबळे, सहसचिव सुरेश मांडवकर, कोषाध्यक्ष- सचिन क्षिरसागर, सहकोषाध्यक्ष – शुभम मदान, प्रसिद्धी प्रमुख – निखिल मार्कडे, सहप्रसिद्धी प्रमुख – हर्ष भारवाणी, सहकार्याध्यक्ष राजु रिंगोले, सहसंयोजक मयुर गोयंका इत्यादीं परिश्रम घेतले. विजय चोरडिया, विजय पुण्यानी, राजेश बत्रा, संतोष मार्कंडे, आशिष गुप्ता, नारायण गोडे, दिवान फेरवानी, राजाभाऊ बिलोरिया, अरुण कावडकर, गजानन बत्तुलवार यांच्या मार्गदर्शनात हा जन्मोत्सावाचे नियोजन करण्यात आले. समितीच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

पाहा शोभायात्रेतील विविध क्षण….

Comments are closed.