वणी,रवी धुमणे: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं कायर गाव सध्या अवैध धंद्याचं आगार बनलंय. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, बंद झालेल्या दारूच्या दुकानाजवळ, महाकालपूर फाटा, बाबापूर रोडलंगत अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू झाला आहे. सोबतच बस स्थानकाजवळ असलेल्या हॉटेलच्या मागे मटका आणि जुगार जोमात सुरू आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गालगत असलेली दारूची दुकाने बंद झाली आहे. मात्र यामुळे अवैध दारू विक्रीला उधाण आलं आहे. केवळ छोट्यामोठ्या कारवाया दाखवून पोलीस प्रशासन वरिष्ठांची दिशाभूलच करीत असल्याचं कायर येथील सुरू असलेले अवैध धंदे बघितले की स्पष्ट होतं. शिरपूर ठाण्याचे ठाणेदार या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करून अवैध व्यावसायिकांना जणूकाही पाठबळच देत असल्याचं दिसत आहे.
शिरपूर पोलीस ठाणं हे वरकमाईचं ठाणं म्हणून सर्वसामान्यांमध्ये ओळखलं जातं. शिरपूर ठाण्याच्या हद्दीत खनिजांच्या खाणी असल्यानं अवैध व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांची येथे चांगलीच रेलचेल आहे. अवैध दारू, जुगार, मटका यात परिसरातील नागरिक ओढले जात असून यामुळे कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायर येथील अवैध व्यवसाय कधी बंद होणार असा सवाल आता परिसरातील नागरिक करीत आहे.