VIDEO: नागपुरात गोमांस असल्याच्या संशयावरुन मुस्लिमाला मारहाण

तथाकथित गोरक्षकांचा उच्छाद आता विदर्भातही

0

नागपूर: गोमांस असल्याच्या संशयावरुन नागपुरात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नागपूरमधील भारसिंगीमध्ये हा प्रकार घडला आहे. सलीम इस्माईल शाह असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार बुधवारी घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने या मारहाणीचा व्हिडीओ जारी केला आहे. मारहाण झालेला व्यक्ती हा मांस विक्रेता असल्याची माहिती मिळते आहे. पीडित व्यक्तीच्या घरी कार्यक्रम असल्याने दुसऱ्याच जनावराचं मांस घेऊन तो घरी चालला होता. पण त्याच्याकडे असलेलं मांस हे गोमांस असल्याच्या संशयाने काही अज्ञातांच्या जमावाने त्याला हटकलं आणि मारहाण करायला सुरूवात केली. विक्रेत्याला झालेली बेदम मारहाण व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चौघांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर त्यां चौघांना गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली आहेत. मोरेश्वर तांदूळकर, जगदीश चौधरी, अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गोमांस असल्याच्या केवळ संशयावरुन जमावाकडून मारहाण केल्या जात असल्याच्या घटना वाढत आहेत. या मारहाणीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्याच महिन्यात जुनैद नावाच्या एका अल्पवयीन मुलाची हरयाणामध्ये हत्या करण्यात आली होती. गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावाने दिल्लीहून बल्लभगडला परतणाऱ्या जुनैदला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत जुनैदचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या काही दिवसांनंतर झारखंडमधील गिरीदिहमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. सुमारे दोनशे लोकांनी मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करत त्याच्या घराला आग लावली. संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर गाय मृतावस्थेत सापडल्याने जमावाने हे कृत्य केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.