सुशील ओझा, झरी: तालुक्यात रेती तस्करांनी कहर केला असून याला सर्वस्वी जवाबदार महसूल व पोलीस विभागच जवाबदार असल्याचे आढळून येत आहे. रेतीचोर व तस्करांवर महसूल विभागाला कार्यवाहीचे अधिकार होते. परंतु आता पोलिसांनाही असे आदेश देण्यात आल्याने रेती तस्करीत कमी होणे गरजेचे होते. मात्र उलट काही भ्रष्ट कर्माचा-यांच्या ‘माती’ खाण्याच्या प्रवृत्तीमुळे रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीसाठे करून ठेवण्यात आले आहे.
झरी तालुक्यात कोरपना, वणी, तेलंगणा येथून मोठ्या हायवाद्वारे रेती भरून खाली केली जात आहे. रेती तस्करी करणाऱ्या ट्रक मालकाकडून अर्थपूर्ण कामासाठी विशेष कर्मचारी ठेवण्यात आले आहे. जे ट्रक मालक पैसे देत नाही अशा ट्रकवर पाळत ठेऊन असे ट्रक अडवले जाते व त्यांच्यावर रेती चोरीची केस लावली जाते. याशिवाय जप्त केलेला ट्रक खनिकर्म विभागाकडे न देण्याचा नावावर मोठी रक्कम वसूल केली जात असल्याचे बोलले जात आहे.
मुकुटबन, कोसारा व पिंपरड व नेरड येथील 5 ते 6 ट्रॅक्टरने विनारॅायल्टी रेतीचोरी करून 5 ते 6 हजार रुपये ब्रास प्रमाणे विक्री केली जात आहे. यातून तस्कर लाखो रुपये कमवीत आहे. वरील चारही गावातील रेटोचोरटे यांचे महसूल विभागातील काही कर्मचाऱ्या सोबत तसेच ठाण्यातील काही कर्मचारी सोबत एकदम मधुर व अर्थपूर्ण संबंध आहे.
‘खादाड’ कर्मचा-यांना मटण व बिर्याणीची ‘रॉयल्टी’
कारवाई होऊ नये यासाठी सर्व कर्मचा-यांना हॉटेल, धाबे व इतर ठिकाणी ओली पार्टी देऊन खुश ठेवले जाते. तसेच जे कर्मचारी पार्टीत आले नाही अशा कर्मचारी व अधिकारी यांना मटण, बिर्याणी इत्यादींचा डब्बा घरपोच दिला जातो. अश्या पार्टी व रेती तस्करीची खमंग चर्चा चवीने संपूर्ण तालुक्यात केली जाते. अशा ‘खादाड’ कर्मचा-यांमुळे संबंधीत विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. त्याबदल्यात तस्कर ट्रॅक्टरद्वारे बिनधास्त दररोज रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत रेतीचोरी करतो. अशी माहिती आहे.
याबाबत महसूल व पोलीस विभागाला माहिती असूनही कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडून केली जात नाही. काही रेतीचोरटे स्वतःचा गोरखधंदा वाचविण्याकरिता बाहेर गावातील रेती भरलेले ट्रक आले की पोलिसांना माहिती देऊन कार्यवाही करायला लावतात व त्यांच्या कडून वसुली करण्यास लावतात. यातून कागदोपत्री कार्यवाहीही होते व स्थानिक चोरट्यांचा व्यवसाय देखील सुरक्षीत राहतो.
आजपर्यंत कोसारा मुकुटबन व पिंपरड येथील रेतीचोर व तस्करांबाबत पोलीस व महसूल विभागाला माहिती असून सुद्धा कार्यवाही करण्यात येत नसल्याने प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांवर कुणाचेच वचक नसल्याने असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी हे सुद्धा “मी नाही त्यातली कडी लावा आतली” सारखे सोंग घेऊन बसून आहे. प्रशासनाने आपले कर्तव्य निट पार पाडून तस्करी बंद करावी अशी अपेक्षा तालुक्यातून केली जात आहे.
हे देखील वाचा: