लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा रस्त्याची दुरवस्था

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा या रस्त्याची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांकडून 16 जून रोजी दुपारी 12 वाजता लालगुडा चौपाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्यासह लालगुडा, भालर, लाठी, निवली, तरोडा येथील गावक-यांनी निवेदन दिले आहे.

लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वणी यांच्या अखत्यारित येतो. या रस्त्यावर धोपटाळा, भालर, बेसा, लाठी, निवली, तरोडा, निलजई ही गावे आहेत. या गावातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक शेती, शेतीपुरक कामे, नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता या रस्त्याने ये-जा करतात. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊ प्रवास करावा लागत आहे.

अपघाताचे प्रमाण वाढले
रस्त्याची दुरवस्था असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. शाळकरी मुलांना आणि गर्भवती महिलांना तर भयंकर त्रास होतो. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळेही अपघाताची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा अपघात झालेले असून अनेकांनी प्राण गमावले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासन या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग दुरुस्त करुन सुरळीत करुन देण्याचे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.

या रस्त्याबाबत दिनांक 8 मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 4 एप्रिल रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन रस्ता मंजूर असून लवकरच नविन रस्ता बनवून मिळेल असे उत्तर प्रशासनाकडून मिळालेले आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला आहे.

निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे, सुधीर कनाके, राकेश पोटे, राहूल खारकर, राजू पिंपळकर, तुषार पोटे, सचिन धेंगळे, विशाल देवतळे, पुंडलिक खोके, गणेश माहुरे, आशिष माहूरे, गणेश कडूकर, भवसागर पेटकर, रुपेश पोटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Comments are closed.