धक्कादायक: शिवसैनिक ललित लांजेवार यांचे निधन
सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता हरपला
बहुगुणी डेस्क, वणी: शिवसैनिक ललित लांजेवार यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. ते शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख होते. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत कळा येऊन त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यांची प्राणज्योत मालवली. ते त्यांच्या शारीरिक स्वास्थाबाबत कायम जागरूक राहायचे. नियमीत व्यायाम, ग्राउंडवर रोज सकाळी फिरायला जाणे, योग्य आहार, बाहेरील पदार्थ न खाणे अशी ते काळजी घ्यायचे. कॉलेज जीवनातच त्यांनी युवासेना (तेव्हाची विद्यार्थी सेना) जॉईन करून शिवसैनिक म्हणून आपली राजकीय, सामाजिक कारकिर्द सुरु केली. विद्यार्थी सेना, युवासेनेत त्यांनी विविध पद भूषवले. त्यानंतर नुकतेच त्यांनी शिवसेना (शिंदे) गट जॉईन केला होता. पक्षाने त्यांच्यावर शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. ते नेहमी अडल्या नडल्यांना मदत करायचे. वणीतील विविध विषयावर, समस्येवर ते निवेदन देऊन, प्रकरणाचा पाठपुरावा करून सर्वसामान्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने वणीतील राजकीय, सामाजिक क्षेत्राला जबर धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता हरपला अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले व मोठा आप्त परिवार आहे.
Comments are closed.