‘तो’ परिसर ठरतोय लुटारुंचा अड्डा, आणखी एकाला लुटले

दीपक चौपाटीजवळ बाहेरगावातील पाहुण्याला लुटले, बाहेरगावातील पाहुणे टारगेटवर

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटीजवळ जत्रा रोड परिसरात बाहेरगावाहून आलेल्या मित्रांच्या जोडगोळीला दोन भामट्यांनी बळजबरी अडवणूक केली. लुटण्याचे चिन्ह दिसताच एक मित्र पळाला. मात्र त्याच्या साथीदार लुटला गेला. रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज दोघांनी बाहेरगावातील पाहुण्यांकडून लुटला. गेल्या आठवड्यात भर दिवसा कोरपना येथील एका पाहुण्याची याच पद्धतीने मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. संध्याकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सातत्याने अशा घटना घडत असल्याने हा परिसर लुटीचा अड्डा बनत असल्याचे समोर येत आहे. 

फिर्यादी गंगाधर नारायण मुरारी (29) व त्याचा मित्र शिवसाम हडप्पा लोनाळे (35) हे दोघेही बोथ जिल्हा अदिलाबाद येथील रहिवासी आहेत. ते दोघेही सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुचाकीने कामानिमित्त वणीत आले होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ते दीपक टॉकीज जवळील जत्रा रोड परिसरात आले होते. दरम्यान 20 ते 25 वयोगटातील दोन तरुण त्यांच्या जवळ आले. या दोघांनी त्यांना अडवले. दमदाटी करीत तुम्ही इकडे कसे आले अशी विचारणा केली.

त्यानंतर दोघांनी गंगाधरला दमदाटी करीत पकडून झुडुपात नेले. या प्रकाराने गंगाधरचा मित्र घाबरला. तो तिथून पळून गेला. दोघांनी गंगाधरच्या खिशातील 2200 रुपये व मोबाईल जळजबरी हिसकावून घेतला. ते दोघे एकमेकांना अजय व दिनेश नावाने बोलवत होते. गंगाधरने पोलीस स्टेशन गाठत अजय व दिनेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी दिनेश व आरोपी अज्या या दोघांविरोधात बीएनएसच्या कलम 309(4) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. संध्याकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

तो परिसर ठरतोय लुटीचा अड्डा
गेल्या आठवड्यात याच परिसरात भर दिवसा कोरपना येथील एका पाहुण्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. या परिसरात मनोरंजनासाठी टॉकीज आहे, बार आहे.  त्यामुळे अनेक लोक येथे मनोरंजनासाठी येतात. बाहेरगावातील पाहुण्यांचा पण या परिसरात वावर मोठ्या संख्येने असतो. बाहेरगावातील मोटार सायकलचा नंबर बघून लुटारू त्यांना थांबवतात. त्यानंतर बळजबरी झुडुपात नेऊन त्यांना लुटले जात आहे. सध्या दोन घटना पुढे आल्या आहेत. मात्र आणखी किती तरुणांना या परिसरात लुटले गेले, याची माहिती नाही. मात्र बदनामी पोटी परिसरातील तरुण लुटीबाबत मौन बाळगतात. या परिसरात सातत्याने लुटीच्या घटना घडत असल्याने तरुण दहशतीत आला आहे. या परिसरात असे दोन तरुण संशयास्पद आढळल्यास तरुणांनी अलर्ट राहिले पाहिजे. पोलीस प्रशासनाने अशा भुरट्या लुटारुंबाबत कठोर पावलं उचलून त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.