बाहेरगावचा पाहुणा वणीत आला, दीपक टॉकीजजवळ दोघांनी लुटले

लुटारुंनी केली एक चूक आणि अवघ्या दोन तासात अडकले पोलिसांच्या जाळ्यात

विवेक तोटेवार, वणी: पाहुणचारासाठी आलेल्या एका पाहुण्याला दोन लुटारुंनी लुटले. त्यांनी मोबाईल व रोख लुटून घटनास्थळावरून पळ काढला. सोमवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जत्रा रोडवरील एका बार समोर घडली. याबाबत तरुणाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायधीशांनी त्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, नंदकिशोर प्रकाश जीवने (30) रा. अकोला ता. कोरपना हा तरुण मुकुटबन येथे एका कार्यक्रमाला आला होता. पाहुणचार संपल्यानंतर तो दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी येथे आला. त्यानंतर तो ऑटो करून दीपक चौपाटी जवळ उतरला. दीप्ती टॉकीजच्या जवळ असलेल्या एका बारसमोर त्याला दोघांनी अडवले. 

त्या दोघांनी नंदकिशोरला धमकावून त्याच्याजवळील मोबाईल व 1 हजार 800 रुपये हिसकावून घेतले. नंदकिशोरला लुटल्यानंतर त्यांनी पळ काढला. नंदकिशोर याने तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या 309(4) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.

मयूर थांब…! हाच ठरला क्ल्यू….
नंदकिशोरला लुटल्यावर पळून जाताना मयूर नामक लुटारू मागे होता. तेव्हा त्याच्या साथीदाराने त्याला मयूर थांब असा आवाज दिला. हा क्ल्यू पकडून पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. पोलिसांना खबरीकडून मयूर राजू गारघाटे (20) रा. पेटूर ता. वणी हा घटनास्थळी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला गाठले व त्याची चौकशी केली. त्याने व त्याचा साथीदार साहिल कैलास पुरी (19) रा. सेवानगर याने एकाला लुटून त्याच्याकडून व्हीवो कंपनीचा मोबाईल व 1800 रुपये लुटल्याची कबुली दिली.

अवघ्या 2 तासात दोन्ही आरोपींना अटक केली. मंगळवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांचीही यवतमाळ येथे रवानगी करण्यात आली. घटनेचा तपास पोऊनी सुदाम असोरे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.