लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे 12 प्राध्यापक संपात सहभागी

0

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यभरात मंगळवारी 25 सप्टेंबर पासून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 12 प्राध्यापक सहभागी झाले आहेत. मंगळवारी या प्राध्यापकानीं महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत सरकारला निवेदन दिले.

प्राध्यापकांच्या ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ या संघटनेने हा बेमुदत संप पुकारला आहे. शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, जूनी पेंशन योजना लागू करावी, विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातिल वेतनव्यवस्था नियमित करावी, बेकायदेशीर कपात केलेले 71 दिवसाचे वेतन अदा करावे, सातव्या वेतन अयोगाची अंमलबजावणी करावी या यात प्रमुख मागण्या आहेत.

सर्व प्राध्यापक संपात सहभागी नाहीत
जरी शिक्षकांच्या संघटनेने हा संप पुकारला असला तरी सर्व प्राध्यापक यात सहभागी झाले नाही. याआधी एकदा संपात शामिल झाल्याने त्यांचा 71 दिवसांचा पगार कपात करण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही सरकार आपला पगाराची कपात करणार अशा भीतीपोटी काही प्राध्यापक या संपात शामिल झाले नाही. या प्रकाराने पुन्हा एकदा सरकारची मुस्कटदाबी दिसून आली.

सरकार जोपर्यंत प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत कोणतीही तडजोड मान्य करणार नसल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला संपात सहभागी असणाऱ्या प्राध्यापकांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.