तब्बल 5 दिवसानंतर माधुरीचा मृतदेह आढळला

'या' ठिकाणी आढळला मृतदेह, आज होणार अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दुपारी मारेगाव येथील माधुरी अरुण खैरे (28) या तरुणीने पाटाळ्याच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेतली होती. शनिवार सकाळपासून माधुरीचा शोध बचाव पथक करीत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास माजरी जवळ नदीपात्राच्या गाळात माधुरीचा मृतदेह फसलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आज सकाळी 11 वाजता मारेगाव येथील राहत्या घरून माधुरी यांची अंतयात्रा होणार आहे.

प्राप्त माहिती नुसार, माधुरी अरुण खैरे (28) ही मारेगाव येथील वार्ड क्रमांक 5 येथील रहिवासी होती. तिच्या वडिलांचे 10 वर्षांआधी निधन झाले तर आईचे मार्च महिन्यात निधन झाले होते. आईवडिलांचे छत्र हरवल्याने ती व तिचा मोठा भाऊ दोघेच घरी राहायचे. तिने फार्मसीची डिग्री केली आहे. शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती भावाला वणी येथे कॉलेजच्या कामासाठी जाते सांगून घरून निघाली होती. वणी येथे पोहोचल्यानंतर ती वरोरा येथे जाणा-या ऑटोत बसली. ऑटो पाटाळ्याच्या पुलावर आल्यावर तिने ऑटोला थांबवले व ती ऑटोतून उतरली. त्यानंतर तिने नदीपात्रात उडी घेतली होती.

दुपारच्या सुमारास काही प्रवाशांना पुलावर पर्स, चप्पल, मोबाईल आढळले. याच वेळी माजरी येथील एक रहिवासी असलेले दाम्पत्य या मार्गावरून जात होते. ते फोटो काढण्यासाठी पुलावर थांबले होते. दरम्यान माधुरीच्या मोबाईलवर कॉल आला. त्यांनी कॉल उचलून पाटाळ्याच्या पुलावर या वस्तू संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती दिली. माधुरीच्या भावाला ही माहिती मिळताच त्याने नातेवाईकांसह तातडीने घटनास्थळ गाठले. येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्हीत माधुरी पुलावरून उडी मारताना दिसली.

शनिवारी सकाळ पासून बचाव पथक माधुरीचा वर्धा नदीच्या पात्रात शोध घेत होते. मात्र पावसाची संततधार आणि नदीला पूर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास माजरीजवळ माधुरीचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळला. माधुरीने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.