परिवारातील आद्यगुरु म्हणजे सासू आणि माता- वैद्य सुवर्णा चरपे

जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या व्याख्यानात प्रतिपादन

बहुगुणी डेस्क, वणी: सारखी सूचना देणारी समजली तर ती सासू जड होईल. आई चित्रकलेची शिक्षक असते. ती आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र रेखाटण्याची मुभा देते. तर सासू ही गणिताची शिक्षका असते. ती काटेकोर असते. यापाठीमागे तिचाही अनुभव असतो. खरं पाहता परिवारातील आद्यगुरु म्हणजे सासू किंवा माता. त्यांना परिवारातील सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. स्त्री ही आद्यगुरु म्हणून बघितली पाहिजे.

सासू म्हणजे घरातलं चालतं बोलतं विद्यापीठच आहे. असे प्रतिपादन स्तंभलेखिका आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य सुवर्णा चरपे यांनी केलं. जागतिक महिलादिनानिमित्त स्थानिक नगर वाचनालयात त्यांचं ‘सासू समजून घेताना’ या विषयावर त्यांचं व्याख्यान झालं. याप्रसंगी त्यांनी हा विषय मांडला. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध संस्थांशी जुळलेल्या ज्येष्ठ नागरिक भारती सरपाटवार होत्या. नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळ उपाख्य माधव सरपटवार हे विचारपीठावर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुवर्णा चरपे यांनी सुरवातीला आयुर्विज्ञानाच्या अंगाने मानवाच्या शारीरिक आणि मानसिक मांडणीवर चर्चा केली. आपल्या भावभावना, आपला स्वभाव, आपल्या प्रतिक्रिया यांसाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात असं त्या म्हणाल्यात. त्यात आपल्या शरीरातील रासायनिक रचनाही तेवढाच महत्त्वाची असते. सासू विषय मांडताना त्यांनी सर्वसमावेषक चर्चा केली. त्या म्हणाल्यात की, सासूवर आपण प्रेमपूर्वक श्रद्धा ठेवली पाहिजे.

ती ज्येष्ठ म्हणून आपली सर्वोत्तम गुरू ठरते. आपली सासूच नव्हे तर आपण प्रत्येक व्यक्तीकडे बघतानाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्त्री वेगवेगळ्या रूपात येते. त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य वेगवेगळं आहे. त्याचं आपलं मापही वेगळं आहे. त्यामुळे त्यात स्पर्धा किंवा कसलीच वरचढ नसावी.

मुलगी घरात जन्माला आली तर घराचं गोकुळ होतं. मुलगी घरात चैतन्य आणते. स्त्री आणि पुरुष देह वेगवेगळे आहेत. तसेच त्यांची शारीरिक आणि मानसिक संरचनाही वेगळी असते. आपण जागरण शक्यतो टाळलं पाहिजे. आईच्या बाळंतपणानंतर तिच्या शरीराची खूप चीज होते. स्त्रीवर भावनिक ताण असतो. संगोपनाची संपूर्ण जबाबदारी पुरुष संस्कृतीने स्त्रिवर सोपवली आहे. बाळ जन्माला येतं तेव्हा आई-वडलांचे दोघांचीही गुणसूत्रे त्याच्यात येतात.

सून असो की, सासू असेल तशीच स्वीकारावी लागणार आहे. बरेचदा स्त्रिला कळतच नाही हसू की रडू. मानवी भावना या रासायनिक प्रक्रियांमुळे होतात. रज, तम आणि सत्व या गुणांनुसार माणसाची वागणूक असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत स्त्रिला समजून घेतलं पाहिजे. सुनेची जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी तिच्या नवऱ्याचीही आहे.

तिला भावनिक गरज आहे. मुलांनीदेखील आपल्या आईला समजून घेतलं पाहिजे. स्त्रिची कितीही चिडचिड झाली तरी, ती कुटुंबाच्या अहिताचा विचार करणार नाही. तिला तिच्या आयुष्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आपल्या सासूच्या पूर्वायुष्यातील घटनांचा आढावा घ्यावा. सासूच्या मनाची घालमेल समजून घ्यावी.

माधवराव सरपटवर यांनी प्रास्ताविक भूमिका मांडली. महिलादिनाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याचंही ते म्हणालेत. यवतमाळ ग्रंथोत्सवात नगर वाचनालयाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सचिव गजानन कासावार, ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले यांचा सत्कार झाला. वक्त्या वैद्य सुवर्णा चरपे यांना ग्रंथ भेट दिली. नगर वाचनालय हे 140 वर्ष जुनं आहे. इथं अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. चरपे यांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रहाचं श्रेय सासूंना दिलं हे विशेष. त्यांनी स्वतः आपल्या सासूंना समजून घेतलं.

अध्यक्षीय भाषणात भारती सरपटवार यांनी संपूर्ण व्याख्यानाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, वैद्य सुवर्णा यांनी अनेक तथ्य मांडलीत. सासू आणि सून दोघींनीही एकमेकिंना सन्मानाचं स्थान द्यावं. दोघींनीही एकमेकींच्या कामात लुडबूड करू नये. सासू ही वयाने मोठीच असते. सासूने शक्यतो सुनेच्याही कारभारात ढवळाढवळ करू नये.

सोबतच दोघींनीही हलक्या कानांचं राहू नये. गुण्यागोविंदानं राहून सुखाचा संसार करावा. सासूच्या पोटात जाऊन काम करावं. परिवारातील सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सर्वांनी एकमेकांशी जिव्हाळ्यानं राहावं. एकमेकांमध्ये सूर मिळून राहावं. याप्रसंगी भारती सरपटवार यांनी अनेक अनुभव शेअर केलेत.

कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण झालं. अतिथींच्या स्वागतानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक सातच्या विद्यार्थ्यीनींनी स्वागतगीत प्रस्तुत केले. त्याच टीमने शिक्षिका शुभांगी वैद्य आणि शिक्षक दिगंबर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलादिन स्पेशल नृत्य केलं.

यात एकता शिखरे, आरती डंभारे, भैरवी मडावी, मैथिली अवताडे, सृष्टी सालुरकर, लावण्या फाळके या विद्यार्थीनी होत्या. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता चुंबळे यांनी महिलादिनाचे गीत प्रस्तुत केले. मैथिली विनोद अवताडे या विद्यार्थिनीने एक समयोचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. आभार अर्जुन उरकुडे यांनी मानलेत.

Comments are closed.