एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर मजनूचा रात्री धिंगाणा

मजनू व त्याच्या 2 मित्रांवर विनयभंगाच्या गुन्ह्यासह पॉक्सो दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन कॉलेज कुमारिकेच्या घरासमोर रात्री उशिरा जाऊन धिंगाणा घालणा-या व अश्लिल शेरेबाजी करणा-या तीन मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मजनू व त्याच्या 2 मित्रांवर वणी पोलीस ठाण्यात विनयभंग व पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सोहेल अफसर शेख (20) रा. वागदरा ता. वणी, तेजस भगत (21) व स्वप्नील चिंचोलकर दोघं रा वणी असे आरोपी तरुणांचे नाव आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोहेल शेख हा वागदरा येथील रहिवासी आहे. सोहेलला पीडित मुलगी ओळखत असून तिचे त्यांच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र पाच सहा महिन्याआधी पीडितेला तिच्या प्रियकर तिच्याशी प्रामाणिक नसून त्याचे इतर मुलीसोबतही प्रेम असल्याचे कळले. त्यामुळे गेल्या काही काळापासून तिने सोहलशी संबंध तोडून त्याच्याशी बोलणे टाळायला सुरूवात केली.

प्रेयसी बोलत नसल्याने सोहेलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो दुचाकीने मित्रांसह पीडितेचा पाठलाग करायचा. तो तिच्या घराबाहेर घिरट्या घालायचा. तसेच ती कुठेही गेली तर दुचाकी व चारचाकी गाडीने तिचा पाठलाग करुन तिला अश्लिल कमेन्ट करायचा. शिवाय त्याने तिची बदनामी करायला सुरुवात केली. आरोपीच्या धाकामुळे तिने कॉलेजला जाणे सुद्धा बंद केले.

बुधवारी दिनांक 18 ऑक्टो. रोजी पीडिता तिच्या आई व बहिणीसोबत घरी होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी सोहेल दुचाकीवर त्याचा मित्र तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर सोबत आला. घराबाहेर उभे राहून या तिघांनी तिच्या नावाने जोरा जोराने हाक मारायला सुरुवात करून शिवीगाळ सुरु केली. रात्री सुरू असलेल्या गोंधळामुळे पीडिता, तिची आई, बहिण घराबाहेर आले. त्यांनी या तिघांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने मी तुमच्या सर्वांचे जगणे मुश्कील करतो, अशी धमकी दिली.

आरोपी व त्याच्या मित्रांच्या त्रासाने कंटाळून अखेर पीडितेने आपल्या मोठ्या बहिणीला सोबत घेऊन वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सोहेल अफसर शेख (20) रा. वागदरा ता. वणी, तेजस भगत (21) व स्वप्नील चिंचोलकर रा. वणी विरुद्ध कलम 354, 354(D), 504, 506, भादंवि तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) कलम 11 (4) व 12 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.