बहुगुणी डेस्क, वणी: मांडवी गावात कौटुंबिक वादाने रविवारी रात्री हिंसक वळण घेतले. दारूच्या नशेत घरी परतलेल्या पतीने पत्नीवर काचेच्या बाटलीने हल्ला करत तिचे डोके फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता सासू आणि सासऱ्यांनीही मारहाण केली. रविवारी 14 जून रोजी रात्री ही घटना घडली.
तक्रारीनुसार, पीडिता (23) ही झरी तालुक्यातील मांडवी येथील रहिवासी आहे. तिचे घराशेजारी राहणा-या कृष्णा (28) नामक तरुणावर प्रेम होते. सहा महिन्याआधी तिने घरून पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर ती गावात येऊन पतीसह राहू लागली. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र त्यानंतर पती हा संध्याकाळी दारू पिऊन यायचा व पत्नीला मारहाण करायचा.
14 जून रोजी रात्री सुमारे 8 वाजता पती दारूच्या नशेत घरी आला. घरात प्रवेश करताच त्याने पत्नीशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. काही क्षणांतच वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या पतीने हातातील काचेची बाटली पत्नीच्या डोक्यावर आदळली. बाटलीचा जबर फटका बसताच प्रणाली यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.
अचानक झालेल्या या हल्ल्याने घरात एकच गोंधळ उडाला. यावेळी सुनेला वाचविण्याऐवजी सासरे व सासू हे देखील मारहाण करण्यास पुढे आले. त्यांनी सुनेवार चापटाबुक्क्यांचा वर्षाव केला. त्यानंतर या तिघांनी मिळून पत्नीला घरातून निघून जाण्यास सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. शेजाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद शांत केला.
प्रेमासाठी घर सोडलं; संसाराने दिले जखमांचे उत्तर
प्रेमासाठी घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन लग्न केले होते. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेणारा पतीच तिचा आधार बनेल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांत वास्तव समोर येऊ लागले. वारंवार होणारे वाद, मारहाण आणि मानसिक छळ यामुळे तिचे वैवाहिक आयुष्य संकटात सापडले. अखेर दारूच्या नशेत झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रेमविवाहाचे स्वप्न भंगले असून, ज्याच्यासोबत संसाराची स्वप्ने रंगवली त्याच्याविरुद्ध तिला पोलिसांत धाव घ्यावी लागली.
घटनेनंतर जखमी महिला माहेरी गेली. तिने आई व वडिलांना सोबत घेत पाटण पोलीस स्टेशन गाठत पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरू आरोपी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5), 352, 351(2) आणि 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.