ब्रेकिंग न्यूज – मारेगाव–झरी सीमेजवळ भुकंपाचा धक्का
पेंढरी–गोधणी पट्ट्यात NCS कडून भुकंपाची अधिकृत नोंद
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव–झरी सीमेजवळ सोमवारी (दि. 8 जून) सायंकाळी 5.12 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.0 इतकी नोंदवण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या संस्थेने या भूकंपाची अधिकृत नोंद घेतली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा पेंढरी, सुसरी आणि गोधणी या परिसरादरम्यान असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा धक्का अतिशय सौम्य स्वरूपाचा असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याची जाणीवही फारशी झाली नाही. दिवसभरातील हालचालींमुळे असे सौम्य धक्के अनेकदा लक्षात येत नाहीत, तर रात्रीच्या वेळी ते अधिक जाणवतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भूगर्भशास्त्र अभ्यासक सुरेश चोपणे यांच्या मते, वणी–मारेगाव–झरी परिसर हा खनिज संपत्तीने समृद्ध असून येथे चुनखडकाचे प्रमाण अधिक आहे. भूगर्भात पाणी गेल्यास चुनखडकाशी प्रतिक्रिया होऊन सूक्ष्म हालचाली निर्माण होऊ शकतात, ज्यातून असे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवतात. त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्याने खाणकामादरम्यान होणाऱ्या ब्लास्टिंगमुळेही भूगर्भीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी 3-4 दिवस सौम्य धक्क्यांची शक्यता – सुरेश चोपणे
वणी उपविभाग हा प्रत्यक्षात भूकंपप्रवण क्षेत्र नाही. मात्र येथील भौगोलिक रचना आणि खनिज संपत्तीमुळे अधूनमधून लहान भूकंपाचे धक्के जाणवतात. या धक्क्यांची तीव्रता इतकी कमी असते की अनेकदा ते रिश्टर स्केलवरही नोंदले जात नाहीत. एकदा भूकंपाचा सौम्य हादरा बसल्यानंतर पुढील तीन ते चार दिवस अशा किरकोळ हालचाली होण्याची शक्यता असते. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. — सुरेश चोपणे, भूगर्भशास्त्रज्ञ
25 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या
25 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली वणी तालुक्यातील बोर्डा (घोन्सा) परिसरात भुकंप सदृष्य धक्के जाणवले होते. तसेच या ठिकाणी भूगर्भातून धूर देखील निघला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या परिसरात चुनखडक आहे. तसेच बोर्ड्याजवळ एक तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव भरतो. मात्र पावसाळा झाला की काही दिवसातच या तलावाचे पाणी आटते. या तलावा खालील जमीन पोकळ आहे. त्यामुळे पाणी झिरपून चुनखडकांपर्यंत जाते. त्यामुळे जमिनीखाली असलेला चुनखडक विरघळला. परिणामी तयार झालेल्या पोकळीमुळे हा भाग खचला व या भागात भुकंप सदृष्य धक्के जाणवले. तसेच चुनखडक पाण्याच्या संपर्काने विरघळल्याने कार्बन डाय ऑक्साईड हा वायू तयार झाला. हा वायू भूगर्भातून बाहेर आला. असे पुढे संशोधनातून समोर आले होते. रासा, घोन्सा, बोर्डा या भागात दर दोन तीन वर्षातून एकदा असा भूकंप सदृष्य धक्का बसतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. कुंभा येथील कथित भूकंपाच्या चर्चेमुळे बोर्डा येथील कथित भूकंपाच्या अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्यात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रात्री मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र याची नोंद काही झाली नव्हती.

या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रशासनानेही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांतही किरकोळ भूकंपीय हालचाली जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments are closed.