बहुगुणी डेस्क, वणी: अवघ्या 100 रुपयांच्या मजुरीच्या वादातून एका मजूराला काठीने मारहाण करण्यात आली. बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी मांगरुळ या गावात ही घटना घडली. या प्रकरणी मजुराच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या आरोपीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मजुराने शिविगाळ केल्याचा आरोप करत आरोपीच्या पत्नीने मजुराविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अविनाश शंकर तुराणकर (27) हा मांगरुळ येथील रहिवासी असून तो गवंडी काम करतो. एक महिन्यापूर्वी त्यांनी गावातीलच गजानन गोडे (48) यांच्या घरी गवंडी काम केले होते. या मजुरीसाठी 400 रुपये ठरले होते. त्यांनी मजुरीचे 300 रुपये दिले तर 100 रुपये बाकी होते. बुधवारी अविनाश गावातील रोडवरील एका घराच्या ओट्यावर बसला होता. दरम्यान तिथे गजानन आला.
अविनाशने गजाननला 100 रुपयाबाबत विचारणा केली. त्यावर गजाननने आठ दिवसांनी देतो असे म्हटले. यावरून दोघांत वाद झाला. गजानन याने शिवीगाळ करत घरून काठी आणली व अविनाशच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गावातील एकाने हस्तक्षेप करून ही मारहाण सोडवली. या मारहाणीत अविनाशच्या डोक्याला ईजा झाली. या घटनेनंतर अविनाश याने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
मेडीकल सर्टिफिकेटच्या आधारे पोलिसांनी आरोपी गजानन मनोहर गोडे याच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर गजानन यांच्या पत्नीने अविनाश याने त्यांना अश्लिल शिविगाळ केल्याचा आरोप करीत परस्पर विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून अविनाश विरोधात बीएनएसच्या कलम 296, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.





Comments are closed.