पोलिसांची मटक्यावर धाड, पुन्हा दुस-या दिवशी मटका सुरु

दीपक चौपाटी परिसरात चालणा-या मटका पट्टीवर कारवाई

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटी जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी व गुरुवारी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपी व मटका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची मटका पट्टीवर सातत्याने धाड सुरु असते, मात्र दुस-या दिवशी पुन्हा मटका सुरु होतो. ही एक चिंतेची बाब बनली आहे.

गुरुवारी दिनांक 13 जून रोजी पोहेकॉ. विकास धडसे यांना दीपक टॉकीज चौपाटीजवळ मटका पट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथक नगर पालिका कॉम्प्लेक्स मागील मोकळ्या जागी दुपारी 2 वाजताच्या सुमारास गेले. तिथे त्यांना काही इसम मटका पट्टी लावताना दिसले. मटका सुरु असल्याचे दिसताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली.

धाड पडताच लोकांची पळापळ झाली. मात्र चिठ्ठी लिहून देणारा पोलिसांच्या हाती लागला. तो खरबडा येथील रहिवासी असून रोजंदारीवर काम करतो. अधिक चौकशी केली असता त्याने सदर मटका हा प्रेमनगर येथील रहिवासी असलेल्या शंकर गणपत धंदरे (58) नामक इसमाचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी कडून मटका लावण्याचे साहित्य व रोख रक्कम अशी 5040 रुपये जप्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

धाड नंतर दुस-या दिवशी पुन्हा मटका सुरू
या घटनेच्या दोन दिवस आधी दिनांक 11 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती. या प्रकरणी पोलिसांनी रंगनाथ नगर येथील एक व मामिनपुरा येथील एक अशा दोघांना अटक केली होती. या दोन्ही घटनेतील मटका चालक एकच आहे. वणीत अनेक ठिकाणी राजरोसपणे मटका चालतो. पोलिसांनी त्यावर सातत्याने कार्यवाही देखील होत असते. मात्र दुस-या दिवशी पुन्हा मटका सुरु होतो.

या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी रोजंदारीवर काम करणा-या तिघांसह मटका नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ विकास धडसे व पथकाने केली.

Comments are closed.