… अन् पारधी बांधवांचे धान्यासाठीचे हेलपाटे थांबले…

ना. तहसिलदार विवेक पांडे यांनी बेड्यावर जाऊन दिले रेशन कार्ड

निकेश जिलठे, वणी: पारधी समुदाय म्हणजे निरंतर भटकंती. हे एक पक्का समीकरण झालं. पोटासाठी वणवण करणारा हा समाज आता कुठे गाव वस्त्यांजवळ स्थिरावत आहे. तरीही त्यांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यांची पोटापाण्यासाठीची वणवण, जगण्याचा संघर्ष आजही कायम आहे. मेंढीलीतील पारधी बेड्यावर 23 ते 24 कुटुंबांना रेशनसाठी तब्बल 50 ते 80 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करून रेशनचे धान्य आणावे लागायचे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही पायपिट सुरुच होती. वेळोवेळी त्यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली. अखेर वणी तहसिलचे नायब तहसिलदार विवेक पांडे यांनी पुढाकार घेतला. 23 कुटुंबाचे रेशन कार्ड निघाले. सोमवारी दिनांक 5 मे रोजी या कुटुंबाना बेड्यावर जाऊन रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. पुढल्या महिन्यापासून त्यांना रेशनचे धान्य सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धान्यासाठी होणारे हेलपाटे थांबल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. याबाबत माकपच्या नेतृत्त्वात पारधी बांधवांनी उपोषण देखील केले होते. 

काय होती समस्या ?
पारधी समाजातील साधारणता 23 कुटुंबे गेल्या 16 ते 17 वर्षांपूर्वी राळेगाव तालुका येथून स्थलांतरित होऊन मेंढोली या गावात आले. मात्र त्यांचे रेशन कार्ड राळेगाव तालुक्यातीलच होते. रेशनकार्ड राळेगाव तालुक्यातील असल्याने ते दर महिन्याला स्वस्त धान्य उचलण्यासाठी मेंढोली येथून राळेगाव तालुक्यात येथे जावे लागत होते. मेंढोली ते राळेगाव तालुक्यातील अंतर हे 50 ते 80 किलोमीटर पेक्षा अधिकचे आहे. त्यामुळे यात त्यांची रोजी तर बुडायची शिवाय त्यांना तिकीटचा आर्थिक भूर्दंडही बसायचा.

गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी वणी तालुक्यातून रेशन कार्ड साठी अर्ज दाखल केला. परंतु लाभार्थीचे नाव राळेगाव तालुक्यातून कमी न झाल्याने त्यांचे अर्ज निकाली निघू शकले नाही. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन ना. तहसिलदार विवेक पांडे यांनी राळेगाव येथील पुरवठा कार्यालयाला संपर्क साधला. तहसीलदार निखील धूळधर यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्यामार्फत तहसील कार्यालय राळेगाव येथे संपर्क साधला गेला. अखेर त्यांची नावे रीतसर ऑनलाईन प्रणालीतून राळेगाव तालुक्यातून कमी करण्यात आले. नाव कमी झाल्यावर रेशन कार्ड तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला.

ना. तहसिलदार विवेक पांडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रेशन कार्ड तयार करण्याच्या कामाला लागले. त्यांनी रेशन कार्ड तयार केले. दिनांक 5 मे रोजी रोजी विवेक पांडे हे स्वत: त्यांच्या सहका-यासह मेंढोली गावातील पारधी बेड्यावर गेले. तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी रेशनकार्डचे वितरण केले. तसेच एका महिन्याचा आत त्यांना रेशन चालू करण्याचे आश्वासन दिले.

माकपतर्फे करण्यात आले होते उपोषण
स्थलातरीत झालेले कुटुंब मेंढोलीत झोपड्या बांधून राहतात. यातील काही लोक शेती तर काही लोक मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलं आता स्थानिक शाळेत शिकतात. मात्र त्यांचा रेशन कार्डचा प्रश्न सुटला नव्हता. याबाबत कॉ. मनोज काळे व शाखा सचिव कॉ. प्रकाश घोसले यांचे नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते. माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांना पाठिंबा व्यक्त केला होता. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.