विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : नव विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व मानसिक त्रास दिल्याची पिडीत महिलेच्या फिर्यादवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी महिलेच्या पती, सासू व सासऱ्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अविनाश पृथ्वीराज चव्हाण (24), पृथ्वीराज चव्हाण (55) व राजकन्या पृथ्वीराज चव्हाण (42) रा. बरदगाव सुर्लिक (अंबलिका) ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, वणी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या फिर्यादीचा जुलै 2022 मध्ये गावातच रीतिरिवाजाप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील बरदगाव सुर्लिक (अंबलिका) येथील अविनाश चव्हाण सोबत लग्न झाला होता. लग्नानंतर काही दिवस सासू, सासरे व पतीने तिला चांगली वागणूक दिली. मात्र लग्नाला एक महिना उलटत नाही तर नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत विवाहितेने सासू सासऱ्याला सांगितले. मात्र त्यांनी मुलाची बाजू घेऊन तिला टोचून बोलणे व पतीला तिच्याविरुद्ध भडकविने सुरु केले.

दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी घरकाम करीत असताना काही कारण नसताना नवऱ्याने तिला मारहाण केली. तसेच तू इथे राहू नको, आपल्या आई वडिलांकडे निघून जा असे सांगितले. तेव्हा पिडीत विवाहितेने आपल्या आईला फोन करून बोलाविले व आईसोबत माहेरी निघून आली. तेव्हापासून ती आईवडिलांकडे राहत आहे. त्यानंतर दिनांक 18 मे रोजी पिडीत महिलेनी मुकुटबन पोलीस ठाण्यात पती व सासू सासरे शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिली.

कौटुंबिक वाद असल्याने पोलिसांनी सदर प्रकरण समुपदेशन करून समेट घडवून आणण्यासाठी महिला सेल पांढरकवडा येथे पाठविले. मात्र गैर अर्जदार पती, सासू, सासरे महिला सेलमध्ये काऊंसलिंगसाठी हजर झाले नाही. त्यामुळे महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा कडून मुकुटबन पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्यात आले. तसेच फिर्यादी महिलेने दिनांक 20 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध कलम 498 (A), 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Comments are closed.