बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. कुटुबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिता (16 वर्ष 11 महिने) ही शहरापासून जवळ असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. ती इयत्ता 12 व्या वर्गात शिकते. सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी तिचा पेपर असल्याने ती दु. 1 वाजता नांदेपेरा येथे पेपरला जाते, असे सांगून घरून निघाली. मात्र संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने ती रोज सेंटरवर जात असलेल्या तिच्यासोबतच्या मैत्रिणींना विचारणा केली.
तेव्हा तिच्या मैत्रिणीने सांगितले की पीडितेने आम्हाला तुम्ही ऑटो पॉइंटला निघा. आज माझा भाऊ मला बाईकने सेंटरवर सोडून देणार आहे. असे सांगितल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे ती आज पेपरला देखील आली नाही. अशी माहितीही तिच्या मैत्रिणीने दिली. हे ऐकूण पीडितेच्या आईला धक्का बसला. तिने ही बाब घरी सांगितली.
पीडितेचा गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध सुरु झाला. नातेवाईक व मैत्रिणींना विचारणा करण्यात आली. मात्र तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुस-या दिवशी सकाळी पीडितेच्या वडिलांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. मुलीला कुणीतही फूस लावून पळवून नेल्याचा संशय पीडितेच्या कुटुंबीयांना आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.