अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

मारेगाव व वणी येथील घटना, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी आणि मारेगाव येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. यातील वणी येथील घटना ही मंगळवारी तर दुसरी मारेगाव येथील घटना रविवारी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना ही वणीतील असून यातील पीडिता ही 16 वर्षाची आहे. ती वणीतील रहिवासी असून तिची आई घरकाम करते. मंगळवारी दिनांक 25 जून रोजी पीडितेची आई सकाळी नेहमीप्रमाणे घरकामासाठी गेली होती. तेव्हा घरी दोघे बहिण भाऊ होते. दुपारी पीडिता ही बॅग भरून घरून निघून गेली. मुलाने ही बाब तिच्या आईला फोन करून सांगितली. आईने मुलीला फोन केला असता तिचा फोन स्विच्ड ऑफ दाखवत होता. त्यांनी परिचितांकडे विचारणा केली असता त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांना कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याचा संशय आला. अखेर पीडितेच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठले.

दुस-या घटनेतील पीडिता (17) ही मारेगाव तालुक्यातील रहिवासी असून ती तिच्या आईवडिलांसह राहते. रविवारी दिनांक 23 जून रोजी पीडितेच्या घरचे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी ते परत आले असता त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही. सर्व ठिकाणी शोध व चौकशी केली असता त्यांना एका 22 वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

या दोन्ही वेगवेगळ्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोन दिवसात मुली पळून जाण्याच्या तीन घटना समोर आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.