8 वी मध्ये शिकणारी मुलगी बेपत्ता, फूस लावून पळविल्याचा संशय

अज्ञात आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक शाळेत 8 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली 13 वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाली. गुरूवारी दिनांक 4 एप्रिल रोजी ही घटना घडली. मुलीला फूस लावून पळविल्याचा संशय असून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. 

पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबीयांसह वणी येथे राहते. गुरूवारी 4 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मुलीचे वडील कामाला निघून गेले. यावेळी मुलगी ही घरी एकटीच होती. सायंकाळी 7 वाजता घरी आल्यावर वडिलांना ती घरी दिसून आली नाही. वडिलांनी त्यांच्या आईला विचारणा केली असता दुपार पासून नात घरी नसल्याची माहिती तिने दिली.

मुलीच्या वडिलांनी शेजा-यांना, नातेवाईकांना तसेच तिच्या मैत्रिणींना मुलीबद्दल विचारणा केली. परंतु तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. वडीलांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी दिनांक 5 एप्रिल रोजी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.