बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकाकडे जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून तिच्यावर अत्याचार केला. गेल्या डिसेंबर महिन्यातली ही घटना आहे. दरम्यान तिच्या पोटात गर्भाची वाढ होत असल्याने ही बाब उघडकीस आली. त्यामुळे पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता (16) ही मारेगाव तालुक्यातील रहिवासी असून ती अल्पवयीन आहे. डिसेंबर महिन्यात पीडितेचे आईवडिल बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती गावातच असलेल्या एका नातेवाईकाकडे जात होती. दरम्यान तिला वाटेत आरोपी वैभव राजूरकर (22) रा. बोदाड (राजूर) हा दुचाकीने आला. त्याने पीडितेला गाठून कुठे जात असल्याचे विचारणा केली व तिला तिच्या नातेवाईकांकडे सोडण्याचा हट्ट केला. त्यामुळे ती त्याच्या दुचाकीवर बसली.
आरोपीने पीडितेला मारेगाव येथील हायवेवरील एका बारमागील झुडुपात नेले. तिथे त्याने तिच्यावर बळजबरी करीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सध्या तिच्या पोटात गर्भ वाढत होता. ही बाब पीडितेच्या पालकांना कळली. त्यांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता तिने झालेली सर्व घटना कथन केली.
पीडितेच्या पालकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी वैभव राजूरकर याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 64 (1) सह पोक्सो व ऍट्रोसिटीसह गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.



Comments are closed.