निकेश जिलठे, वणी: आमदार संजीवरेडड्डी बोदकुरवार हे सलग दुस-या विजयानंतर तिस-यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दांडगा जनसंपर्क, विकासकामे व लोकप्रियता यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, अशी प्रतिक्रिया बोदकुरवार यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर दिली होती. जनसंपर्क व लोकप्रियता वाढण्यात मोठा वाटा त्यांच्या घरी चालणा-या जनता दरबाराचा राहिला आहे. जनता दरबारात गा-हाणे, समस्या घेऊन आलेले अधिकाधिक लोक समाधानी होऊन परत जातात. त्याचाच परिणाम म्हणून 2019च्या निवडणुकीत अवघ्या पाच वर्षातच त्यांचे सुमारे 22 हजारांपेक्षा अधिक मतदार वाढले. गेल्या पंचवार्षिकमध्ये हा जनसंपर्क आणखी वाढला आहे. त्यामुळे जनता दरबार हा एक मास्टरस्ट्रोक ठरत असल्याचे बोलले जात आहे.
मतदानाचा सतत वाढता ग्राफ
सन 2014 च्या निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले. या निवडणुकीत त्यांनी 45,178 मते मिळवत शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांचा सुमारे साडे 5 हजार मतांनी पराभव केला. सन 2019 च्या निवडणुकीत त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. त्यांना विक्रमी 67710 इतकी मते मिळाली. त्यांनी सुमारे 28 हजार मतांनी काँग्रेसच्या वामनराव कासावार यांचा पराभव केला. पहिल्या निवडणुकीत साडे 5 हजारांची असलेली लीड दुस-या निवडणुकीत 23 हजारांवर गेली. या वाढत्या ग्राफमधून त्यांची लोकप्रियता व जनसंपर्क वाढल्याचे दिसून येते.
जनता दरबाराची मोठी भूमिका
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची लोकप्रियता वाढण्यात मोठी भूमिका जनता दरबाराची आहे. रोज सकाळी 8 वाजताच्या सुमारास बोदकुरवार यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरतो. या जनता दरबाराला फक्त वणी शहरातीलच नाही तर खेड्यापाड्यातील लोक सुद्धा मोठ्या संख्येने येतात. यासह सर्व जाती धर्माचे लोक, विद्यार्थी, महिला, वृद्ध इत्यादींचा यात समावेश असतो. विविध प्रशासकीय काम, समस्या, गा-हाणे, पत्र इत्यादींसाठी सकाळपासूनच बोदकुरवार यांच्या निवासस्थानी गर्दी होते. सकाळी सुरु झालेला हा दरबार दु. 11 वाजेपर्यंत चालतो. कुणी एकटे तर कुणी गृपने आमदार बोदकुरवार यांची भेट घेण्यास येतात. रोज सुमारे 300 ते 400 लोक या जनता दरबारात येतात, अशी माहिती आहे.
स्पिकर फोन ऑन, काम सुरु…
जनता दरबारात आलेल्या व्यक्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्यावर आ. बोदकुरवार यांचा भर असतो. जनता दरबारातूनच ते अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधीत व्यक्तीला फोन लावतात. फोन स्पिकरवर टाकतात आणि सर्वांसमोरच अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधीत व्यक्तीशी बोलतात. स्पिकर फोनवर बोलल्याने थेट बोलणे होते. संबंधीत व्यक्तीकडून काम होण्याची ग्वाही मिळते. त्यामुळे घरी काम घेऊन आलेली व्यक्ती समाधानी होऊन परत जाते. गावात आमदारांनी भेट दिल्यावरही अनेक लोक त्यांना कामासाठी संपर्क साधतात तेव्हा देखील ते स्पिकर फोन ऑन करूनच संबंधीत व्यक्तीशी बोलतात. एकदा निवडून आले की लोकप्रतिनिधी कधीही दिसत नाही, सर्वसामान्यांशी कधी भेटत नाही. अनेक नेते व लोकप्रतिनिधींच्या घराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद असतात. किंवा कामासाठी कार्यालयात भेटण्यास सांगितले जाते, अशी मतदारांची कायम तक्रार असते. मात्र बोदकुरवार यांच्या घराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी कायम उघडे असतात.
जनता दरबार ठरतोय मास्टरस्टोक !
अधिवेशनाचा काळ किंवा बाहेरगावातील दौरा सोडला तर सर्वच दिवस जनता दरबार सुरु असतो. त्यामुळेच जनतेचे गा-हाणे, समस्या थेट ऐकणारा लोकप्रतिनिधी म्हणून बोदकुरवार यांची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा जनता दरबार सुरु आहे. 2019 च्या निवडणुकीत बोदकुरवार यांचे सुमारे 22 हजार मतदार वाढले. या मतदारांमध्ये जनता दरबारात काम झालेल्या अधिकाधिक मतदारांचा समावेश असल्याचे बोलले जाते. 2019 मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क आणखी वाढला आहे.
आजपर्यंत कोणत्याही नेते किंवा लोकप्रतिनिधींचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडे नव्हते. त्यामुळे याचे बेनिफिट आमदारांना निवडणुकीत नक्कीच मिळणार, अशी आशा त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करतात. जनता दरबारासह विकासकामे आणि लाडकी बहिण यावरही आ. बोदकुरवार यांच्या प्रचाराची भिस्त राहणार आहे. याला मतदार कसा प्रतिसाद देणार हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार.
Comments are closed.