बस स्टॉप समोर पार्क केलेली ट्रॅक्टरची ट्रॉलीच चोरट्याने पळवली

शेलू बस स्टॉप जवळील घटना, चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: बस स्टॉपजवळ पार्क केलेली चक्क ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्याने पळवून नेली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या शेलू येथे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. या ट्रॉलीची किंमत दीड लाख रुपये आहे. चोरट्याने चक्क ट्रॅक्टरची ट्रॉलीच लंपास केल्याने हा सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

Podar School 2025

फिर्यादी गजानन मारोती कुचनकार (43) हे शेलू येथील रहिवासी असून ते शेती करतात. त्यांनी 15 वर्षांआधी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेतला होता. तर 8 महिन्याआधी त्यांनी नवीन ट्रॉली विकत घेतली होती. घरासमोर पुरेशी जागा नसल्याने ते ट्रॅक्टर घरासमोर लावायचे, तर ट्रॉलीला बस स्टॉप समोरील मोकळ्या जागेत पार्क करीत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शनिवारी दिनांक 12 एप्रिल रोजी ते नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. संध्याकाळी ते गावात परतले. त्यांनी बस स्टॉपसमोर ट्रॅक्टरची ट्रॉली पार्क केली तर ट्रॅक्टरची मुंडी घरासमोर पार्क केली. रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी बस स्टॉपकडे चक्कर मारली होती. तेव्हा ट्रॅक्टरची ट्रॉली ठेवलेल्या ठिकाणी दिसली. रविवारी सकाळी 7.30 वाजता ते शेतात जाण्यासाठी निघाले. त्यांनी ट्रॅक्टर बाहेर काढले.

ते ट्रॉली जोडण्यासाठी बस स्टॉपजवळ गेले असता त्यांना तिथे ट्रॉली आढळली नाही. त्यांना कुणीतरी शेतक-याने शेतीच्या कामासाठी ट्रॉली नेली असावी असे वाटले. त्यांनी आजूबाजूच्या शेतक-यांना विचारणा केली. मात्र ट्रॉली काही आढळली नाही. अखेर त्यांना ट्रॉली चोरून नेल्याचा खात्री पटली. त्यांनी तातडीने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

सावधान… ! चोरट्याने काढले पुन्हा डोके वर, विनायक नगरमध्ये घरफोडी

 

Comments are closed.